काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' सध्या मध्य प्रदेशात आहे. शिवराज सिंह यांच्या राज्यात राहुल गांधी 12 दिवस असून, यात 380 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. त्यानंतर ते राजस्थानला जातील. या यात्रेत राहुल गांधींसोबत अनेक लोक सहभागी होत आहेत. यातच भारतीय क्रीडा जगतातील एका स्टारनेही राहुल यांना प्रवासात साथ दिली.
बॉक्सिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक पदक मिळवून देणारा स्टार विजेंदर सिंग भारत जोडो यात्रेत सहभागी झाला. बीजिंग ऑलिम्पिक-2008 मध्ये विजेंदरने कांस्यपदक जिंकले होते. राहुल गांधींनी विजेंदरसोबतचे फोटो आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघंही त्यांच्या मिशांना पिळ देताना दिसत आहेत.
दुसर्या फोटोत राहुल आणि विजेंदर हात धरून चालताना दिसत आहेत. विजेंदरने दक्षिण दिल्लीतून काँग्रेसच्या तिकिटावर 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्याला विजय मिळवता आला नाही. भाजपच्या रमेश बिधुरी यांच्याकडून विजेंदरला पराभव पत्करावा लागला होता. विजेंदरने खरगोनमध्ये यात्रेत सहभाग घेतला. काँग्रेसने राहुल गांधी आणि विजेंदरचा फोटो 'वखरा स्वॅग' या कॅप्शनसह ट्विट केला आहे.