Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी पुलवामा हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केला आहे. पण, राहुल गांधी यांनी त्यांच्या वक्तव्याला सहमत नसल्याचे म्हटले आहे. 'दिग्विजय सिंह जे बोलले त्याच्याशी मी सहमत नाही. माझा लष्करावर पूर्ण विश्वास आहे. भारतीय लष्कर कोणतेही ऑपरेशन करण्यास सक्षम आहे, त्याचा पुरावे देण्याची गरज नाही' असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
काय म्हणाले दिग्विजय सिंह?दिग्विजय सिंह यांनी मंगळवारी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केला होता. 'पुलवामामध्ये 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. तेव्हा सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना सर्व जवानांना एअरलिफ्ट करण्याची विनंती केली होती, पण मोदींनी ते मान्य केले नाही. आजपर्यंत पुलवामाबाबत कोणताही अहवाल संसदेसमोर मांडण्यात आलेला नाही. सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा पुरावाही दाखवला नाही,' असे वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केले होते.
हे दिग्विजय सिंह यांचे वैयक्तिक विधान राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो यात्रा' सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आहे. राहुल गांधी यांनी जम्मूमध्ये पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यादरम्यान राहुल गांधी यांना दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, 'हे दिग्विजय सिंह यांचे वैयक्तिक वक्तव्य आहे. त्यांच्या विधानाशी मी सहमत नाही. माझा देशाच्या लष्करावर पूर्ण विश्वास आहे.'
गुलाम नबींची माफी मागितलीएवढंच नाही तर राहुल यांनी यावेळी काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांची माफीही मागितली. भारत जोडो यात्रेसाठी गुलाम नबी आझाद यांना निमंत्रित न करण्याबाबत विचारले असता राहुल गांधी म्हणाले, 'गुलाम नबी आझाद यांच्या पक्षातील बहुतांश लोक आमच्यासोबत बसले होते. 90 टक्के लोकांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केलाय. त्या बाजूला फक्त गुलाम नबी राहिले आहेत. मी गुलाम नबी आझाद यांचा आदर करतो. माझ्यामुळे त्यांना दुखावलं गेलं असेल तर मी त्यांची माफी मागतो.' गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन स्वत:चा पक्ष स्थापन केला. मात्र आता त्यांच्या पक्षातील बहुतांश नेत्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.