Rahul Gandhi Birthday : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा आज(19 जून) 54 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त देशभरातून राहुल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, राहुल यांनी काँग्रेस मुख्यालयात केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge), पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi), केसी वेणुगोपाल, तरुण गोगोई आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते. यावेली खरगेंनी राहुल गांधींचा हात धरून केक कापला आणि राहुल गांधींना स्वत:च्या हाताने भरवला.
राहुल गांधींच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ काँग्रेसने एक्सवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी केक कापत असताना पाठीमागे असलेले सर्व नेते 'हॅपी बर्थडे डियर राहुल जी' म्हणताना ऐकू येत आहेत. केक कापल्यानंतर खरगे एक तुकडा उचलतात आणि लगेच राहुलला भरवतात. त्यानंतर राहुलदेखील केकचा तुकडा खरगेंना खाऊ घालतो. पुढे प्रियांका आणि राहुल एकमेकांना केक खाऊ घालताना दिसत आहेत.
मल्लिकार्जुन खरगेंच्या राहुल गांधींना खास शुभेच्छाकाँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडियावरुन राहुल यांना खास शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, 'राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 'विविधतेत एकता, समरसता आणि करुणा ही काँग्रेस पक्षाची नीतिमत्ता तुमच्या सर्व कृतीतून दिसून येते, कारण तुम्ही सत्याचा आरसा हातात धरून शेवटच्या माणसाचे अश्रू पुसण्याचे तुमचे मिशन सुरू ठेवत आहात. मी तुम्हाला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा, असं खरगे म्हणाले.
प्रियंका गांधी काय म्हणाल्या..?प्रियंका गांधी यांनी राहुल यांच्यासोबतचा एका फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत, 'माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझा जीवनाबद्दलचा अनोखा दृष्टीकोन, जग आणि प्रत्येक गोष्टींचा मार्ग उजळवतो. नेहमी माझा मित्र, माझा सहकारी, मार्गदर्शक, तत्वज्ञानी आणि नेता, चमकत राहा. माझे तुझ्यावर सर्वाधिक प्रेम आहे,' असे प्रियंका यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
राहुल गांधींचा अल्प परिचयराहुल गांधी यांचा जन्म 19 जून 1970 रोजी नवी दिल्ली येथे झाला. ते माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे पुत्र आहेत. राहुलने भारताबरोबरच परदेशातही शिक्षण घेतले आहे. सध्या ते उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून लोकसभेचे सदस्य आहेत. यापूर्वी ते केरळमधील वायनाड येथून खासदार होते.