इम्फाळ - ५४ दिवसांपासून आगीने धुसमुसत असलेल्या मणिपूरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट देण्यावरून गुरुवारी नाट्यमय घडामोडी घडल्या. सुरक्षेच्या कारणावरून स्थानिक प्रशासनाने रोखल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. स्थानिकांना राहुल गांधींशी चर्चा करायची होती. मात्र, पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा मारा करावा लागला. अखेर राहुल यांनी चुराचांदपूर येथील मदत शिबिराला भेट देत स्थानिकांशी संवाद साधला. राहुल म्हणाले की, मी माझ्या मणिपूरच्या सर्व बंधू-भगिनींचे ऐकण्यासाठी आलो आहे. सर्व समाजातील लोक खूप प्रेमळ स्वागत करत आहेत. मात्र, सरकार मला रोखत आहे हे दुर्दैवी आहे. मणिपूरला उपचारांची गरज आहे. शांतता ही आपली एकमेव प्राथमिकता असली पाहिजे, असे ते यावेेळी म्हणाले.
घटनात्मक, लोकशाही नियमांचे उल्लंघन : खरगे सरकारची कारवाई पूर्णपणे अस्वीकार्ह आहे आणि सर्व घटनात्मक आणि लोकशाही नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली.