Rahul Gandhi On Budget 2023: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी (1 फेब्रुवारी) 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांसह महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यात टीव्ही, मोबाईलसह EV कार स्वस्त झाल्या आहेत, तर सोने-चांदीसह काही गोष्टी महाग झाल्या आहेत. आता या अर्थसंकल्पावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पाचे वर्णन 'अमृतकाल बजेट' असे केले आहे, तर राहुल गांधींनी या अर्थसंकल्पाला 'मित्रकाळ'चा अर्थसंकल्प म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केले की, "मित्रकाळाच्या अर्थसंकल्पात नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट नाही, महागाईला तोंड देण्यासाठी कोणतीही योजना नाही, विषमता दूर करण्याचा हेतू नाही. 1% श्रीमंतांकडे 40% संपत्ती, 50% गरीब 64% GST भरतात, 42% तरुण बेरोजगार आहेत, तरीही, पंतप्रधानांना त्याची चिंता वाटत नाही. या अर्थसंकल्पाने सिद्ध केले की, भारताचे भविष्य घडविण्यासाठी सरकारकडे कोणताही रोडमॅप नाही," असे ट्विट राहुल गांधी यांनी केले.
काँग्रेस नेत्यांची अर्थसंकल्पावर टीका काँग्रेसच्या अन्य नेत्यांनीही अर्थसंकल्पावर टीका करताना सरकारवर निशाणा साधला आहे. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "दोन-चार राज्यांच्या निवडणुका लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. हा जुमला अर्थसंकल्प आहे. महागाई रोखण्यासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. रोजगारासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. नोकर भरतीसाठी आणि गरिबांसाठी या बजेटमध्ये काहीही नाही.''
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, ''गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, शिक्षण, मनरेगा आणि अनुसूचित जातींच्या कल्याणाशी संबंधित तरतूदींची प्रशंसा झाली होती. आज वास्तविक खर्च बजेटपेक्षा खूपच कमी आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल म्हणाले, "हा अर्थसंकल्प देशाच्या बेरोजगारी आणि महागाईच्या खर्या भावनेला संबोधित करणारा नाही. त्यात भलत्याच घोषणा होत्या, ज्या यापूर्वीही करण्यात आल्या होत्या. पीएम किसान योजनेचा फायदा केवळ विमा कंपन्यांना झाला आहे, शेतकऱ्यांना नाही."
काँग्रेस नेत्यांनी कौतुकही केलेकाँग्रेसच्या काही नेत्यांनीही अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणाले, "अर्थसंकल्पात काही चांगल्या गोष्टी आहेत, पण मनरेगा, गरीब ग्रामीण मजूर, रोजगार आणि महागाई यांचा उल्लेख नव्हता. काही मूलभूत प्रश्न अनुत्तरीत राहिले."
काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम म्हणाले, "मी कमी कर प्रणालीवर विश्वास ठेवतो. त्यामुळे कोणत्याही कर कपातीचे स्वागत आहे, कारण लोकांच्या हातात जास्त पैसा ठेवणे हा अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे."