दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 10:05 IST2025-04-23T10:04:49+5:302025-04-23T10:05:50+5:30

Congress Rahul Gandhi: "सरकारने जबाबदारी घेऊन आता कठोर पावलं उचलावीत आणि अशा घटना रोखाव्यात," अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

Rahul Gandhi calls Amit Shah after terrorist attack; What was discussed? | दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?

दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?

Jammu Kashmir Terrorist Attack: जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. निष्पाप लोकांच्या मृत्यूने देशभरात हळहळ व्यक्त केली जात असून दहशतवाद्यांना ठेचण्यासाठी सरकारी पातळीवरील हालचालींनाही वेग आला आहे. अशातच काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून चर्चा करत परिस्थितीची माहिती घेतली. तसंच या हल्ल्यानंतर आम्ही सरकारसोबत असून दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी याबाबत एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, "पहलगाम येथील भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर मी गृहमंत्री अमित शाह, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि जम्मू-काश्मीरमधील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तारीक कर्रा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. हल्ल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि हल्ल्यातील पीडित कुटुंबांना न्याय आणि आपला पूर्ण पाठिंबा मिळावा, अशी भावना व्यक्त केली," अशी माहिती राहुल गांधींनी दिली आहे.

"दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट"

पहलगाममधील घटनेवर भाष्य करताना राहुल गांधी यांनी सरकारवरही निशाणा साधला आहे. "ही एक निंदनीय आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो आणि जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना करतो. दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सुधारली असल्याचे खोटे दावे करण्यापेक्षा सरकारने जबाबदारी घेऊन आता कठोर पावलं उचलावीत आणि अशा घटना रोखाव्यात," अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

गृहमंत्री अमित शाह तातडीने काश्मीरला; घेतली उच्चस्तरीय बैठक
पर्यटकांवर दहशतवाद्यांच्या गोळीबारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तातडीने जम्मू-काश्मीरला रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, शाह यांना तातडीने त्यांनी काश्मीरला जाण्यास सांगितले. गोळीबारानंतर त्या केंद्रशासित प्रदेशात उ‌द्भवलेल्या परिस्थितीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केल्याचे त्यांनी म्हटले आहे. श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर शाह यांनी सर्व सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेतली.

दरम्यान, "हा हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दहशतवाद्यांचे कोणतेही मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. दहशतवादाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यात येईल," असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

 

Web Title: Rahul Gandhi calls Amit Shah after terrorist attack; What was discussed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.