राहुल गांधी ईडीच्या कार्यालयातून तीन तासांनी निघाले, पुन्हा आले; चौकशी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 04:22 PM2022-06-13T16:22:39+5:302022-06-13T16:25:02+5:30
देशभरातून ठिकठिकाणी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आज काँग्रेस नेते राहुल गांधी आज सकाळी अकराच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात हजर झाले. यावेळी राहुल यांची तीन तास चौकशी झाली. राहुल गांधी यांना लंच टाईमला बाहेर सोडण्यात आले होते. या काळात राहुल यांनी हॉस्पिटलमध्ये असलेल्या सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाले.
देशभरातून ठिकठिकाणी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गंगाराम हॉस्पिटलमध्ये सोनिया गांधी यांना दाखल करण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्याने नंतरच्या उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्य़ांची प्रकृती स्थिर असून आणखी काही दिवस त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
लंच ब्रेकनंतर राहुल हे पुन्हा ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहेत. राहुल यांची तीन टप्प्यांत चौकशी करण्यात येणार आहे.
#WATCH | Congress leader Rahul Gandhi reaches the Enforcement Directorate office in Delhi for the second round of interrogation after a break, to appear in the National Herald case. pic.twitter.com/rbDddTibRU
— ANI (@ANI) June 13, 2022
देशभरात काँग्रेसची निदर्शने
नॅशनल हेराल्ड प्रकरणात एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी राहुल गांधी यांच्यासह शेकडो पक्ष कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. नागपुरात काँग्रेस कार्यकर्ते ईडी कार्यालयावर धडकल्याने वातावरण चांगलेच तापले. कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी मंत्री विजय वडेट्टीवार यांना ताब्यात घेतले असून आमदार अभिजित वंजारी गिरीश पांडव यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र १९३८ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) ने प्रकाशित केले होते. त्याची स्थापना १९३८ मध्ये झाली आणि इतर ५००० स्वातंत्र्य सैनिक त्याचे भागधारक होते. कंपनीने उर्दूमध्ये कौमी आवाज आणि हिंदीमध्ये नवजीवन ही इतर दोन दैनिकेही प्रकाशित केली. नॅशनल हेराल्डची ओळख भारताच्या स्वातंत्र्यामुळे झाली. वृत्तपत्राला देशातील महान राष्ट्रवादी वृत्तपत्र म्हणून प्रतिष्ठा मिळाली. जवाहरलाल नेहरू नियमितपणे वर्तमानपत्रात कठोर शब्दांत स्तंभ लिखान करायचे.
१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा नेहरुंनी पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्विकारली आणि वृत्तपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण वृत्तपत्राची विचारधारा घडवण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा राहिला. नॅशनल हेराल्ड हे देशातील आघाडीचे इंग्रजी वृत्तपत्र बनले. काँग्रेस पक्षाकडून वृत्तपत्राला आर्थिक मदत सुरुच होती. पण २००८ मध्ये वृत्तपत्राने आर्थिक कारणास्तव कामकाज बंद केले. त्याचे डिजिटल प्रकाशन २०१६ मध्ये सुरू झाले. गांधी कुटुंबाविरुद्धचा खटला भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१२ मध्ये ट्रायल कोर्टात आणला होता. स्वामींनी आरोप केला की, एजीएलचा पैसा गांधी कुटुंबाने काँग्रेस पक्षाचा निधी म्हणून वापरला आणि AJL ताब्यात घेऊन २० अब्ज रुपयांची संपत्ती मिळवली. २००८ मध्ये नॅशनल हेराल्ड बंद झाले तेव्हा काँग्रेस AJL चे मालक होते आणि यावर ९०० दशलक्ष रुपये कर्ज होते.