नवी दिल्ली - लोकसभेच्या 17 व्या सत्राला संसदेत सोमवारी सुरुवात झाली. मोदी सरकार 2 च्या संसदेतील पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नवनिर्वाचित खासदारांनी शपथ घेतली. पहिल्या सत्रातील या शपथविधी सोहळ्यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सभागृहात उपस्थित नव्हते. मात्र, दुपारच्या सत्रात ते हजर झाले. दुपाराच्या सत्रात राहुल गांधींनी नवनिर्वाचित खासदार म्हणून शपथ घेतली.
राहुल गांधी यांनी शपथ घेतल्यानंतर तेथील कागदपत्रावर सही करायचं विसरुन गेले. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर सही न करताच, राहुल आपल्या जागेवर बसण्यासाठी निघाले होते. त्यावेळी, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह तेथील खासदारांनी राहुल गांधींना आवाज देत सही करण्याची आठवण करुन दिली. त्यानंतर, राहुल गांधींनी खासदार म्हणून संबंधित कागदपत्रांवर सही केली. राहुल यांनी इंग्रजीत शपथ घेतली असून ते चौथ्यांदा खासदार बनून संसदेत पोहोचले आहेत. मात्र, यावेळी ते केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेचे खासदार बनले आहेत. यापूर्वी ते आपल्या पारंपारिक म्हणजेच अमेठी मतदारसंघातून खासदार होते. पण, यंदा भाजपा नेत्या स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधींना 55 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव पत्करावा लागला आहे.
दरम्यान, राहुल गांधींनी शपथविधीपूर्वी एक ट्विट करुन संसदेत ही माझी चौथी टर्म असून मी माझ्या नवीन इंनिंगला सुरुवात करत असल्याचे राहुल यांनी म्हटले. तसेच, मी यावेळी वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.