- आदेश रावल नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई होऊ शकते काय, याची काळजी पक्षातील नेत्यांना लागली आहे. उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरात राहुल गांधी म्हणाले होते की, माझ्यावर भारतमातेचे एक रुपयाचेही कर्ज नाही. हेच विधान या घटनाक्रमामागचे मोठे कारण आहे, असे सांगितले जात आहे. राहुल गांधी यांची प्रामाणिक प्रतिमा ईडीच्या माध्यमातून खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस नेत्यांचे असे म्हणणे आहे की, भाजप अथवा डावे पक्ष ज्याप्रमाणे आपले वृत्तपत्र चालवितात त्याप्रमाणेच नॅशनल हेराल्ड हे काँग्रेस पक्षाचे वृत्तपत्र होते. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, जर भाजपचे वृत्तपत्र तोट्यात गेले तर ते त्याला वाचविणार की नाही? राहुल गांधी यांनीही तेच केले. राहुल गांधी यांच्यावर मोठ्या कारवाईच्या शक्यतेची चर्चा आहे. काँग्रेस नेतृत्वाने छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशिवाय सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षाचे नेते, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य आणि संसद सदस्यांना दिल्लीत थांबण्याचे निर्देश दिले आहेत. अग्निपथ योजनेवरून काँग्रेस भलेही दिल्लीत जंतरमंतरवर निदर्शने करीत असेल; पण राहुल गांधी यांच्यावर मोठ्या कारवाईच्या चर्चेमुळे काँग्रेस काळजीत आहे.
काय वाटते काँग्रेसच्या नेत्यांना ?राहुल गांधी यांना अटक करण्याची चूक सरकार करणार नाही. कारण, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला त्याचा राजकीय फायदा होऊ शकतो, असे काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटते. पण, नेत्यांना अशी काळजी आहे की, नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याप्रमाणे कारवाई होऊ नये.
राहुल गांधी यांची आज पुन्हा चौकशीकाँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने उद्या, मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी बोलाविले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत त्यांची ४० तास चौकशी केली. नॅशनल हेराॅल्ड वृत्तपत्राशी संबंधित आणखी महत्वाचे प्रश्न त्यांना विचारणार असल्याचे कळते.