नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याविरोधात काँग्रेस नेता शहजाद पुनावाला यांनी आवाज उठवल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबातच वाद सुरु झाला आहे. शहजाद पुनावाला यांचा भाऊ आणि काँग्रेस समर्थक समजल्या जाणा-या तहसीन पुनावाला यांनी आपल्या भावाची म्हणजेच तहसीन पुनावालाची भूमिका अत्यंत चुकीची असल्याचं सांगितलं आहे. सोबतच, आपण शहजादसोबत असलेली सर्व नाती तोडत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. शहजादच्या वक्तव्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचंही तहसीन पुनावालांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये काँग्रेस निवडणूक जिंकण्याची शक्यता असताना तहसीनने असं वक्तव्य केल्याने आश्चर्य वाटत असल्याचं तहसीन पुनावाला यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनाच अध्यक्ष केलं जाण्याची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे केवळ दिखावा असल्याचे म्हणत पुनावाला यांनी घराणेशाहीवरुन राहुल यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. ''ही निवडणूक प्रक्रिया बनावट आहे. मला असं वाटतं की एका कुटुंबात एकच तिकीट मिळालं पाहिजे, मग शहझाद पुनावाला असो किंवा राहुल गांधी'',असे पुनावाला यांनी म्हटले आहे. उत्तरादाखल तहसीन पुनावाला यांनी ट्विटरवर लिहिलं आहे की, 'अशावेळी जेव्हा काँग्रेस गुजरातमध्ये जिंकत आहे, तेव्हा शहजाद जे काही करत आहे त्यामुळे आश्चर्य वाटत आहे. मी अधिकृतपणे त्याच्यासोबतचे सर्व राजकीय संबंध संपवत आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींचीच गरज आहे'.
यानंतर तहसीन यांनी अजून एक ट्विट करत शहजादसोबत सर्व नाती तोडत असल्याचं जाहीर केलं. त्यांनी लिहिलं की, 'मी अधिकृतपणे शहजादसोबत सर्व नाती तोडत आहे. मी आतापर्यंत एवढा दु:खी कधी झालेलो नाही. आम्हाला भाजपाचा पराभव करायचा होता. मी हे स्विकरु शकत नाही. माझ्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला आहे'.
पुढील एका ट्विटमध्ये त्यांनी सांगितलं की, 'मी शहजादला आपल्या मुलाप्रमाणे वाढवलं आहे. त्याचं अशा प्रकारचे वक्तव्य पाहून मला त्रास झाला. आपल्याला काँग्रेस आणि त्यांच्या सहका-यांना विजयासाठी मजबूत करायचं आहे. कोणतीही तक्रार असेल तर योग्य ठिकाणी मांडलं जाऊ शकतं. मी आणि माझी पत्नी त्याला स्वत:पासून वेगळे करत आहोत'. शहजादने असं करण्यापुर्वी आपल्याशी एकदाही चर्चा केली नाही असा दावा तहसीन पुनावाला यांनी केला आहे.
काय बोलले शहजाद पुनावाला - ''ही निवडणूक प्रक्रिया बनावट आहे. मला असं वाटतं की एका कुटुंबात एकच तिकीट मिळालं पाहिजे, मग शहझाद पुनावाला असो किंवा राहुल गांधी. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणारी लोकंदेखील निवडली गेल्याची माहिती मला मिळाली आहे. या प्रकारानंतर माझ्यावर टीका होऊ शकते, पण मी तथ्य सांगतोय'.
Get Latest Marathi News, Mumbai News, Pune News, Maharashtra News Here on Lokmat.com