काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आव्हान दिले आहे. तुम्ही बोलता खूप, पण अडचण अशी की तुमची उक्ती आणि कृती यांचा मेळ लागत नाही. तुमच्या भाजपाच्या कर्नाटकातील उमेदवार निवडीबद्दल तुम्हाला विचारतो. तुम्ही मौन सोडा, कर्नाटकातील मोस्ट वॉन्टेड नेत्यांबद्दल बोला.
राहुल गांधी यांचे ट्विट आज सकाळपासून ट्विटरवर गाजू लागले आहे. पंतप्रधानांना थेट आव्हान देतानाच त्यांनी ट्विटसोबत असलेला व्हिडिओ हा कर्नाटकातील मोस्ट वॉन्टेडचा एक एपिसोड असल्याचेही म्हटले आहे. या व्हिडिओत भाजपाच्या गुन्हेगारी किंवा वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचा, उमेदवारांचा उल्लेख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेड्डीबंधूंच्या दिलेल्या आठ तिकिटांवर पाच मिनिटे बोलावेच असेही आग्रहाने सांगण्यात आले आहे.
ज्यांच्याविरोधात भ्रष्टाचार, फसवणूक, बनावट दस्तावेज बनवल्याचे २३ गंभीर गुन्हे दाखल आहेत तो तुमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार, असे बी.एस. येडियुरप्पांबद्दल उल्लेख आहे. तसेच अशा वादग्रस्त अकरा नेत्यांबद्दल तुम्ही कधी बोलणार असा सवालही करण्यात आला आहे.
या व्हिडिओ क्लिपमध्ये बी.श्रीरामुलू, जी.सोमशेखर रेड्डी, टी.एच.सुरेश बाबू, कट्टा सुब्रमण्य नायडू, सी.टी.रवी, मुरुगेश निराणी, एस एन कृष्णय्या शेट्टी मालूर, के. शिवगौंडा नाईक, आर.अशोक आणि शोभा करंदलाजे या गुन्हे दाखल असलेल्या भाजपाच्या नेत्यांचा, उमेदवारांचा क्लिपमध्ये उल्लेख आहे.
रेड्डी बंधूंच्या ३५ हजार कोटीच्या खाण घोटाळ्यावर तुम्ही पांघरुण टाकलेत, असेही या व्हिडिओत सुनावण्यात आले आहे. तुमच्या उत्तराची वाट पाहत असल्याचे सांगत, तुम्ही त्यासाठी कागद वापरला तरी चालेल असेही त्यांना सुचवण्यात आले आहे.
कर्नाटकच्या निवडणुकीत नेत्यांच्या भाषणांपेक्षाही त्यांचे समाजमाध्यमांमधील हल्ले-प्रतिहल्ले जास्त गाजत आहेत. त्यातही ट्विटरवर तर जरा जास्तच चर्चा सुरु आहे. त्यातही काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी आतापर्यंत जोरदार लढत देत असून भाजपाचा आयटी सेल तसेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा हेही ट्विटरचा चतुराईने वापर करत आहेत. त्यामुळे आता राहुल गांधीच्या वाराने घायाळ झालेली भाजपा काय उत्तर देते त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.