नवी दिल्ली : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हिंदू आहेत की ख्रिश्चन या प्रश्नावरून सोशल मीडियामध्ये वादळ निर्माण झालं आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिराला नुकतीच राहुल गांधींनी भेट दिली. यावेळी मंदिरात भेट देणाऱ्यांची नोंद करताना त्यांची नोंद अहिंदू (Non-Hindu) या रकान्यात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या नोंदीपुढे राहुल यांची सही नसून ही नोंद माध्यम समन्वयक मनोज त्यागी यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.राहुल गांधी हिंदू आहेत की ख्रिश्चन यावरून याआधी देखील वादळ निर्माण झालं होतं. न्यूयॉर्क टाइम्सने राहुल गांधी यांचं पालनपोषण सोनिया गांधी यांनी ख्रिश्चन रिवाजाप्रमाणे केल्याचा उल्लेख केला होता. यावर राहुल गांधी यांनी खुलासा केल्याचे ऐकीवात नाही, असे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी जाहीरपणे आपला धर्म सांगण्याचे आत्तापर्यंत टाळले आहे. त्यांचा दावा हा सेक्युलर आचारसरणीचा आहे, मात्र सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा धर्म कुठला यावर उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. सोमनाथ मंदिरातल्या त्या नोंदीमुळे त्यात भर पडली आहे. दरम्यान, ट्विटरवर RagaSomnathSelfGoal हा हॅशटॅग अव्वलस्थानी असून एकच चर्चा आहे, ती म्हणजे राहुल गांधी हिंदू आहेत की ख्रिश्चन?
निवडणुकांची रणधुमाळी सुरू असलेल्या गुजरातमध्ये भाजपा व काँग्रेस एकमेकांविरोधात अत्यंत तिखट प्रचार करत आहेत. जातीपातीचे राजकारणही सुरू असून पाटीदार व ओबीसी समाज काँग्रेसकडे वळवण्याचे अविश्रांत परीश्रम राहुल गांधी व काँग्रेस घेत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या धर्मावरून सुरू झालेला हा नवा वाद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुद्दाम तर उकरून काढण्यात येत नाहीये ना, अशी शंका घ्यायला जागा आहे.खरंतर, धर्म ही प्रत्येकाची खासगी बाब आहे, असं आपली घटना सांगत असताना, राजकीय नेत्याबद्दल त्याच्या धर्मावरून उठवणं तुम्हाला योग्य वाटतं का? हे जरूर मांडा...