सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोना साथीत ४० लाख भारतीयांचा मृत्यू, राहुल गांधी यांची भरपाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 08:51 AM2022-04-18T08:51:12+5:302022-04-18T08:53:20+5:30
त्यांनी ट्विटरवर न्यूयॉर्क टाइम्सचा एक वृत्तान्त सामायिक केला आहे. जगभरातील कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सार्वजनिक करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नात भारत खोडा घालत आहे, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाच्या सर्वव्यापी साथीत ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. प्रत्येक मृतांच्या सर्व कुटुंबीयांना चार लाख रुपये भरपाई देण्याची मागणीही त्यांनी पुन्हा केली.
त्यांनी ट्विटरवर न्यूयॉर्क टाइम्सचा एक वृत्तान्त सामायिक केला आहे. जगभरातील कोविडमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या सार्वजनिक करण्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रयत्नात भारत खोडा घालत आहे, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे.
मोदीजी, खरे बोलत नाहीत आणि दुसऱ्यांनाही बोलू देत नाहीत. ऑक्सिजनच्या तुटवड्याने एकाचाही मृत्यू झाला नाही, असे ते आजही खोटे बोलत आहेत, असा आरोप त्यांनी हिंदीतील ट्वीटमध्ये केला आहे. मी आधीही म्हणालो होतो की, कोविडच्या काळात सरकारच्या निष्काळजीपणाने पाच लाख नाही, तर ४० लाख भारतीयांचा मृत्यू झाला. जबाबदारी पार पाडा, मोदीजी, कोविडमुळे मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये भरपाई द्या, असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. कोविड-१९ मृत्युदराचे आकलन करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या पद्धतीवर भारताने शनिवारी प्रश्न उपस्थित करताना म्हटले होते की, विशाल भौगोलिक आकार आणि लोकसंख्या असलेल्या देशांत कोविड मृतांच्या संख्येचा अंदाज लावण्यासाठी अशी गणितीय पद्धत लागू केली जाऊ शकत नाही.