Solar Scam Case: केरळमधील सौर घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या एका महिलेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांसंदर्भात केंद्रीय अन्वेषण ब्युरोने काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांची चौकशी केली. केसी वेणुगोपाल हे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेणुगोपाल यांची एका आठवड्यापूर्वी दिल्लीतील एजन्सीच्या मुख्यालयात चौकशी करण्यात आली होती. केसी वेणुगोपाल हे राहुल गांधी यांचे तसेच दिवंगत अहमद पटेल, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू असल्याचे म्हटले जाते. त्यांची सीबीआयने चौकशी केल्याने हा राहुल गांधी यांना धक्का मानला जात आहे.
केसी वेणुगोपाल यांच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट अशी की राहुल गांधी यांना २०१९च्या निवडणुकीत केरळमधील दुसऱ्या जागेवरून लढण्यासाठी त्यांनीच तयार केले होते. याचे कारण उत्तर प्रदेशातील राजकीय वारे नक्की कोणत्या दिशेने वाहत आहेत याचा अतिशय अचूक असा अंदाज केसी वेणुगोपाल यांनी बांधला होता. त्यांच्या प्रदीर्घ अशा राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक गोष्टींचा अनुभव घेतला होता. त्यानुसार वेणुगोपाल यांनी राहुल गांधी यांना वायनाडमधून निवडणूक लढवण्यास मनधरणी केली होती. आणि त्यात ते जिंकले होते. मात्र अमेठीमध्ये राहुल यांना पराभवाचा सामना करावाच लागला होता.
केसी वेणुगोपाल यांच्याबद्दलचे नक्की प्रकरण काय?
काँग्रेसमधील पक्षाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केसी वेणुगोपाल हे राहुल गांधी यांच्या अतिशय जवळचे आहेत. राहुल यांना काही महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर माहिती देण्याचे काम ते करतात. याशिवाय, काँग्रेसमध्ये अहमद पटेल सोनिया गांधी यांच्यासाठी जी भूमिका बजावत होते, तीच भूमिका सध्या केसी वेणुगोपाल निभावत आहेत. केसी वेणुगोपाल १९९१ मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आले. त्यांना केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणाकरन यांनी त्यांना कासारगोडमधून लोकसभेचे तिकीट दिले. केरळ सौर घोटाळ्याशी संबंधित लैंगिक शोषण प्रकरणात २०२० मध्ये सीबीआयने हे प्रकरण ताब्यात घेतले होते. हा घोटाळा २०१३ मध्ये उघडकीस आला होता. या प्रकरणी केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्यासह अनेक नेत्यांविरोधात चौकशी सुरू करण्यात आली होती.