Rahul Gandhi in Lok Sabha : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी शेतकरी, पेपरफुटी, अर्थसंकल्प या मुद्द्यांवरून मोदी सरकारला धारेवर धरले. देशातील दलित आणि मागासवर्गीयांना कुठेही स्थान मिळत नाही असं म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला. यावेळी राहुल गांधी यांनी महाभारतातील चक्रव्यूहाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मात्र या भाषणादरम्यान एकवेळ अशी आली की, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी डोक्यावर हात मारुन घेतला.
लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणावेळी जोरदार राडा झाला. महाभारतातील चक्रव्यूहाचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. चक्रव्यूहात देशातील युवा, शेतकरी, माता-भगिनी, लघु-मध्यम उद्योजक अडकले आहेत. या चक्रव्यूहाचं चिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या छातीवर लावून फिरतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. मात्र अर्थसंकल्पाबाबत बोलताना राहुल गांधी यांचे भाषण ऐकून अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला.
अर्थसंकल्प सादर होण्याआधी पार पडणाऱ्या हलवा समारंभाचा उल्लेख केला. त्यामुळेच अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी कपाळावर दोन्ही हात मारले. राहुल गांधी यांनी सभागृहात हलवा समारंभाचा फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला, पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नकार दिला. 'बजेटचा हलवा वाटला जात असल्याचा फोटो दाखवून मला स्पष्ट करायचे आहे की, या फोटोत ओबीसी अधिकारी दिसत नाही. आदिवासी अधिकारी आणि दलित अधिकारीही दिसत नाहीत. हे काय सुरु आहे? देशाचा हलवा वाटला जात आहे आणि त्यात तेच लोक नाहीत," असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींचे भाषण ऐकून सीतारमन यांनी हसत दोन्ही हात कपाळावार मारले.
या गदारोळात राहुल गांधी यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. "तुम्ही हलवा खात आहात आणि इतरांना हलवा मिळत नाही. २० अधिकाऱ्यांनी अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकल्याचे आम्हाला आढळून आले आहे. तुम्हा लोकांना नावे हवी असतील तर मी तुम्हाला या अधिकाऱ्यांची नावेही देऊ शकतो," असेही राहुल गांधी म्हणाले.