Rahul Gandhi Lord Ram: भाजपा आणि काँग्रेस यांच्यात धर्माच्या मुद्द्यावरून किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून वादविवाद, हेवे-दावे होणं यात काहीच नवीन नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी हे एकमेकांवर टीका करत असताना बऱ्याचदा प्रभू श्रीराम यांच्याबद्दलचा संदर्भ वापरताना दिसतात. पण आज काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने राहुल गांधी यांची तुलना थेट प्रभू श्रीरामांशी केल्याने चांगलाच वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना भगवान राम म्हटले. त्यावरून भाजपानेही त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
सलमान खुर्शीद काय म्हणाले?
सलमान खुर्शीद म्हणाले, राहुल गांधी हे एखाद्या तपस्वी, योगींसारखे आहेत, जे ध्यानासहित तपश्चर्या करत आहेत. राहुल गांधींचे कौतुक करताना सलमान खुर्शीद पुढे म्हणाले, राहुल गांधी हे सुपर ह्युमन आहेत. आम्हाला इथे थंडीत वाजत असल्याने आम्ही जॅकेट घालतो, पण ते टी-शर्ट घालून (त्याच्या भारत जोडो यात्रेसाठी) देशभर फिरताना दिसत आहे. त्यांची ही यात्रा एखाद्या एकाग्रतेने तपश्चर्या करणाऱ्या योगीं प्रमाणेच आहे. प्रभू रामाशी तुलना करताना खुर्शीद असेही म्हणाले की, प्रभू रामाचे 'खडाव (पादुका)' दूर जातात. कधी कधी भरत 'खडाव' घेऊन भगवना राम जिथे जाऊ शकत नाहीत तिथे ते खडाव नेतात. आता भरताप्रमाणेच आम्हीही यूपीमध्ये खडाव वाहून आणल्या आहेत. आता खडाव यूपीला पोहोचले आहेत, त्यामुळे राम जी (राहुल गांधी)ही लवकरच येतील.
भाजपाकडून खुर्शीद यांच्यावर टीकास्त्र
भाजपाचे शहजाद पूनावाला यांनी सलमान खुर्शीद यांच्या ट्विटरवरील टिप्पणीला हिंदू श्रद्धेचा अपमान असल्याचे म्हटले. त्यांनी लिहिले की, सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींची तुलना भगवान श्री राम यांच्याशी केली, स्वत:ची तुलना भरतशी केली. हे खूपच धक्कादायक आहे. ते इतर धर्मातील देवांशी अशी कोणाची तुलना करण्याचे धाडस करून दाखवू शकतील का? भगवान राम यांचे अस्तित्व नाकारणे आणि राम मंदिर बांधणी थांबवणारे असे बोलत असतील तर हा हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान आहे. खुर्शीद जे बोलतात ते राहुल यांना तरी मान्य आहे का?, असे काही रोखठोक सवाल भाजपाकडून करण्यात आले.
दरम्यान, राहुल गांधी मात्र सध्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत आहेत. तामिळनाडूपासून सुरू झालेली ही यात्रा जम्मू-काश्मीरपर्यंत जाणार आहे.