राहुल गांधींचा यू-टर्न, म्हणे, शिवराज यांच्या मुलाच्या नावामध्ये कन्फ्युज झालो
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 11:05 AM2018-10-30T11:05:09+5:302018-10-30T11:06:54+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी यांनी स्वतःच्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे.
नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मुलगा कार्तिकेयवर पनामा घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिवराज सिंह चौहान आणि त्यांचा मुलगा कार्तिकेय यांनी राहुल गांधींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी यांनी स्वतःच्या विधानावरून यू-टर्न घेतला आहे. 24 तासांच्या आत राहुल गांधींनी या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.
मध्य प्रदेश आणि भाजपा शासित राज्यांत मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्यानं मी संभ्रमात होतो. मध्य प्रदेशातील पत्रकारांशी बातचीत करताना ते म्हणाले, खरं तर पनामा पेपर्स घोटाळ्यात शिवराज सिंह यांच्या मुलाचं नव्हे, तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या मुलाचं नाव आहे. शिवराज सिंह यांचं नाव तर व्यापमं घोटाळ्यात होतं. सोमवारी राहुल गांधींनी एका सभेला संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांनी शिवराज सिंह चौहानांवर हे आरोप केले होते. मामाजींच्या मुलाचं पनामा पेपर्स घोटाळ्यात नाव समोर आलं, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचं घोटाळ्यात नाव होतं.
पाकिस्तानसारख्या देशानं त्यांना तुरुंगात डांबलं, परंतु इथल्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नाव पनामा पेपर्स घोटाळ्यात येऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. राहुल गांधी यांच्या आरोपानंतर शिवराज सिंह चौहान आणि त्यांच्या मुलानं पलटवार केला होता. काँग्रेस माझ्यावर आणि माझ्या कुटुंबीयांवर निराधार आरोप करत आला आहे. आम्ही सर्वांचा सन्मान ठेवून मर्यादा पाळतो. परंतु राहुल गांधी यांनी माझ्या मुलाचं नाव पनामा पेपर्स घोटाळ्यात घेऊन सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तेव्हा त्यांनी मानहानीचा दावा ठोकणार असल्याचंही म्हटलं होतं.