नवी दिल्ली : देशात एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी अनेक जागांवर आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सुद्धा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू आहे. ही यात्रा मिझोराम येथून सुरू झाली असून ती मुंबईत संपणार आहे.
14 जानेवारीला सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' 20 मार्चला मुंबईत संपणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता याआधीच ही यात्रा संपणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'भारत जोडो न्याय यात्रे'चा वेग वाढवण्यात आला आहे. पूर्वी एका दिवसात 70 किलोमीटर प्रवास करण्याची योजना होती. मात्र, आता हा प्रवास दररोज 100 किलोमीटर वेगाने होत आहे. यासह, उत्तर प्रदेशातील यात्रेचा प्रवास आता 11 दिवसांऐवजी 6 ते 7 दिवसात काँग्रेस पूर्ण करणार आहे. यानुसार, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो न्याय यात्रा' येत्या 10 मार्च रोजी संपुष्टात येऊ शकतो.
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे. 'भारत जोडो न्याय यात्रे'दरम्यान अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. तसेच, अनेक मित्रपक्षही इंडिया आघाडीतून बाहेर पडले आहेत. नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाले आहेत. आरएलडीही एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर, इतर अनेक पक्षही काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत. या सगळ्याला तोंड देण्यासाठी राहुल गांधींना ही यात्रा वेळेपूर्वी संपवायची आहे.
जागावाटपाबाबत होतेय विलंब!यासोबतच इंडिया आघाडीतील जागावाटपाच्या विलंबामुळेही अनेक पक्ष चिंतेत आहेत. या दिरंगाईमागे काँग्रेस हे प्रमुख कारण असल्याचे अनेक आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने जागावाटपासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अनेक पक्षांसोबत बैठकाही झाल्या मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. हा निर्णय राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना घ्यायचा आहे. मात्र यासाठी राहुल गांधी यांनी दिल्लीत उपस्थित राहणेही आवश्यक आहे. त्यामुळेच पक्षाला ही 'भारत जोडो न्याय यात्रा' लवकर संपवायची आहे.