नवी दिल्ली: केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात आजपासून काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' सुरू होत आहे, या यात्रेकडून काँग्रेसला मोठ्या आशा आहेत. सत्तेचा सर्वोच्च शिखर अनुभवलेल्या काँग्रेसची आज दयनीय अवस्था झाली आहे, देशभरात पक्ष अंतर्गत आणि बाह्य संघर्षाचा सामना करत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना या यात्रेतून मोठ्या आशा आहेत. या यात्रेच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी तामिळनाडूतील वडिलांच्या समाधीवर पोहोचून प्रार्थना सभा घेतली. यानंतर त्यांचे दिवसभर येथे अनेक कार्यक्रम होतील आणि नंतर प्रवास सुरू होईल. राहुल गांधींच्या या यात्रेबाबत अनेक प्रश्न आहेत. राहुल गांधींसोबत यात्रेत कोण-कोण सहभागी होणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्यासोबत सुमारे 100 कार्यकर्ते असतील. विजेंदर सिंग महलावत हे भारत जोडो यात्रेतील काँग्रेसचे सर्वात वयस्कर नेते असतील, त्यांचे वय 58 वर्षे आहे. महलावत हे राजस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. यात्रेतील सर्वात तरुण कार्यकर्ते म्हणजे अजम जांबोला आणि बेम बाई. दोघेही 25 वर्षांचे असून, ते अरुणाचल प्रदेशचे आहेत. अशाप्रकारे राहुल गांधींच्या या यात्रेत 58-25चा कॉम्बो पाहायला मिळणार आहे. कन्हैया कुमार आणि पवन खेरा हेदेखील राहुल गांधी यांच्यासोबत असतील. याशिवाय सुमारे 30 टक्के महिलाही या यात्रेत सहभागी होणार आहेत.
वडिलांच्या समाधीचे दर्शनकाँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू करण्यापूर्वी बुधवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळावर श्रद्धांजली वाहिली आणि प्रार्थना सभेला हजेरी लावली. राजीव गांधी यांची तीन दशकांपूर्वी तामिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान आत्मघातकी हल्ल्यात हत्या झाली होती. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण केला. त्यांनी वडिलांच्या स्मृतीस्थळी एक रोपटेही लावले. काँग्रेसच्या तामिळनाडू युनिटचे प्रमुख केएस अलागिरी आणि पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते त्यांच्यासोबत होते. यात्रेची औपचारिक सुरुवात करून सायंकाळी ते कन्याकुमारी समुद्रकिनाऱ्याजवळील एका जाहीर सभेला राहुल संबोधित करणार आहेत.
आज रात्री यात्रेला सुरुवात राहुल गांधी आणि अन्य 118 नेते 8 सप्टेंबर रोजी सकाळी पदयात्रेला विधिवत सुरुवात करतील. सुमारे 3,500 किमी लांबीची ही भारत-जोडो यात्रा 12 राज्यांमधून जाणार आहे. यात्रेच्या सुरुवातीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन त्यांना राष्ट्रध्वज सुपूर्द करतील. यात्रा सुरू करण्यापूर्वी राहुल कन्याकुमारीतील विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि कामराज मेमोरियललाही भेट देतील. पदयात्रा 11 सप्टेंबरला केरळला पोहोचेल आणि पुढील 18 दिवस राज्यातून प्रवास करून 30 सप्टेंबरला कर्नाटकात पोहोचेल. ही यात्रा कर्नाटकात 21 दिवस चालेल आणि नंतर उत्तरेकडे इतर राज्यांमध्ये जाईल.