मणिपुरमध्ये गेल्या काही दिवसापासून हिंसाचार सुरू आहे. आतापर्यंत या हिंसाचारात १२० जणांनी जीव गमावला आहे. दरम्यान आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी २९ ते ३० जून या कालावधीत मणिपूर दौऱ्यावर असणार आहेत.
या संदर्भात काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ट्विट करुन माहिती दिली. राहुल गांधी २९ ते ३० जून या कालावधीत मणिपूर दौऱ्यावर असतील. यादरम्यान ते इम्फाळ आणि चुरचंदपूर येथील मदत शिबिरांना भेट देतील आणि नागरी समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतील. मणिपूर जवळपास दोन महिन्यांपासून जळत आहे आणि समाज संघर्षातून शांततेकडे परतण्यासाठी तेथे शांतता आवश्यक आहे. ही एक मानवी शोकांतिका आहे आणि द्वेष नव्हे तर प्रेम पसरवणे ही आपली जबाबदारी आहे, असं ट्विटमध्ये म्हटले आहे.
राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक, एस जयशंकर यांच्यासह 10 खासदारांचा कार्यकाळ पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि इजिप्तच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर रविवारी मध्यरात्री मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेतला.
मणिपूरमध्ये ३ मे रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून विरोधक राज्यातील परिस्थितीवर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. विरोधी पक्ष केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. या पक्षांनी पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यापूर्वी भेटीची वेळ मागितली होती. यानंतर सर्व पक्षांनी मिळून मणिपूरवर निवेदन दिले. या सर्व परिस्थितीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. बैठकीत गृहमंत्र्यांनी विरोधी पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले आणि मणिपूरमधील परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल असे आश्वासन दिले.