Rahul Gandhi Disqualification: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांना आता सरकारी बंगलाही रिकामा करण्याची नोटीस मिळाली आहे. राहुल गांधींना 22 एप्रिलपर्यंत घर रिकामे करावे लागणार आहे. यावरुन काँग्रेससह विरोधी पक्ष सत्ताधारी भाजपवर सातत्याने टीका करत आहेत. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्ष एकवटलेले दिसत आहेत. सोमवारी (27 मार्च) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीला राहुल गांधी आणि सोनिया गांधीही पोहोचले. स्वतः कार चालवत राहुल गांधी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी पोहोचले. यावेळी सोनिया गांधी राहुलच्या शेजारी बसलेल्या दिसल्या. काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये जयराम रमेश, अधीर रंजन चौधरी, केसी वेणुगोपाल, प्रमोद तिवारी आणि रजनी पाटील यांचा समावेश होता.
इतर विरोधी पक्षातील कोण?समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव आणि एसटी हसन, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जेडीयूचे राजीव रंजन सिंह याशिवाय BRS, CPM, RJD, CPI, IUML, MDMK, KC, TMC, RSP, AAP, J&K NC आणि SS चे नेते सामील झाले. पण, सावरकरांवरील टीकेमुळे उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी या बैठकीपासून स्वतःला दूर ठेवले.
संबंधित बातमी- राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे नाराज; काँग्रेसच्या डिनर पार्टीवर शिवसेना खासदारांचा बहिष्कार