नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. यात आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. देशातील बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कायद्यांची माहिती नाही. अन्यथा सगळा देश पेटून उठेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. ते वायनाड येथे बोलत होते.
राहुल गांधी आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाड दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज (गुरुवार) सकाळी ट्विट करून केंद्र सरकारवर टीका केली. वायनाड येथे आयोजित काही कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले. कलपेट्टा येथील कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकावर जोरदार निशाणा साधला.
देशभरातील बहुतेक शेतकऱ्यांना केंद्रीय कृषी कायदे, या कायद्यातील तरतुदी, कायद्यातील नियम यांविषयीची माहिती नाही. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना त्याची नीट माहिती झाली, तर देशात मोठे आंदोलन होईल. सगळा देश पेटून उठेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला. तसेच केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली आहे.
कृषी कायदे रद्द करण्याची मागणी
महात्मा गांधी यांचे एक वाक्य राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. नम्रपणे विरोध करूनही तुम्ही देश हादरवू शकता, हे महात्मा गांधी यांचे वाक्य ट्विट करत, माझी विनंती आहे की, केंद्र सरकारने शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करावेत, असे या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देशातील सद्य परिस्थिती तुम्ही सर्वजण जाणून आहात. केवळ दोन ते तीन बड्या उद्योगपतींच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. प्रत्येक उद्योगावर तीन ते चार उद्योगपतींचा एकाधिकार आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.