नवी दिल्ली: लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या भारत आणि चीनमधील रक्तरंजित संघर्षानंतर अद्यापही तेथील परिस्थितीबाबत ठोस माहिती देण्यात आलेली नाही, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. अशातच काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा LAC च्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. मनमोहन सिंह असते, तर केव्हाच राजीनामा दिला असता. मात्र, भाजपवाले सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
राजस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या एका शिबिराच्या समारोप कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसची लक्ष्मण रेषा सत्य आहे, तर भाजपची लक्ष्मण रेषा सत्ता आहे. हिंदुत्वाची विचारधारा मानणाऱ्या कुणाही समोर हे नतमस्तक होतात. यापूर्वी यांनी इंग्रजांसमोर शरणागती पत्करली आणि आता पैशांसमोर झुकले आहेत. यांच्या मनात सत्याची भावनाच नाही, या शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.
तुम्ही माझ्या विचारांना कैद करू शकत नाही
दुसरीकडे, एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान धर्मगुरूंच्या एका गटाने महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे कौतुक केल्याच्या घटनेवर राहुल गांधी यांनी महात्मा गांधींचे एक वाक्य ट्विट केले. तुम्ही मला बेड्या घालू शकता, माझा छळ करू शकता, या शरीराचा नाश करू शकता, परंतु तुम्ही माझ्या विचारांना कधीही कैद करू शकत नाही, अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले.
दरम्यान, हिंदू आणि हिंदुत्ववादी वरूनही राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले होते. देशात आताच्या घडीला एका बाजूला हिंदू आहेत की जे सत्याची कास धरुन आहेत. तर दुसरीकडे हिंदुत्ववादी आहेत की जे द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत आणि असे लोक सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. या लोकांना आज हिंदुस्थानात हिंदू विरुद्ध हिंदुत्ववादी यांच्या लढाई निर्माण केली आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते.