लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या कारकीर्दीत नोकऱ्याच उपलब्ध होत नसल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. ते म्हणाले की, बेरोजगारी इतकी वाढली आहे की, आठवड्याची सुटी व कामाचे दिवस यांच्यातला पूर्वी जो फरक होता तोच संपत चाललेला आहे. हाताला काम नाही अशी अनेकांची स्थिती आहे. भारतात करत असलेली वाहननिर्मिती थांबविण्याचा निर्णय फोर्ड या अमेरिकी कंपनीने घेतला आहे. त्यामुळे ४ हजार लघुउद्योगही बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भातील बातमीचा हवाला देत राहुल गांधी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, काम नसलेला दिवस कोणता व सुट्टीचा दिवस कोणता यातला फरक ओळखता येणार नाही अशी स्थिती मोदी सरकारच्या काळात निर्माण झाली आहे. देशात मोठ्या प्रमाणावर बेकारी वाढत आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
पोकळ दावे
आमच्या कारकीर्दीत देशात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर झाली, रोजगारीचे प्रमाणही वाढत आहे असे पोकळ दावे मोदी सरकारकडून केले जातात. मात्र कोरोना साथीच्या काळात बसलेल्या फटक्यातून लहानमोठे उद्योगधंदे अद्याप पुरेसे सावरलेले नाहीत, अशी टीका राहुल गांधी यांनी याआधीही केली होती.