PM Modi Security Breach : नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाराणसी मतदारसंघात जाऊन मतदारांचे आभार मानले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे रोड शो देखील केला. मात्र आता पंतप्रधान मोदींच्या ताफ्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एक सुरक्षा कर्मचारी त्याच्या वाहनावरुन काहीतरी वस्तू बाजूला करत असल्याचे दिसत आहे. काँग्रेससह अनेकांनी पंतप्रधान मोदींच्या ताफ्यावर चप्पल फेकली असल्याचे म्हणत हा व्हिडीओ शेअर केला होता. आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी या घटनेंवरुन नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.
वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यावर चप्पल फेकण्यात आली होती जी त्यांच्या एसयूव्हीच्या बोनेटवर पडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला. सोशल मीडियावर लोक याला चप्पल म्हणत आहेत, परंतु अद्याप कोणत्याही प्रकारे याची पुष्टी झालेली नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेतसह अनेक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी सांगितले की, वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुलेटप्रूफ वाहनावर चप्पल फेकण्यात आल्याचे म्हटलं. व्हिडिओमध्ये एक सुरक्षा कर्मचारी बोनेटमधून चप्पल उचलून फेकताना दिसत आहे.
या प्रकरणावरुन आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून भाष्य केलं आहे. "आता देशात पंतप्रधान मोदींना कोणीही घाबरत नाही. पूर्वी ५६ इंचाची असलेली छाती आता ३२ ची झाली आहे. आता मोदींना मानसिकरित्या मोठी अडचण होणार आहे. कारण लोकांना घाबरवून काम करुन घेण्याची त्यांची पद्धत आहे. वाराणसीमध्ये कोणीतरी चप्पल मारली. निवडणुकीच्या आधी कोणाला मारायचं असतं तर तो घाबरला असता. त्यांच्या पक्षातही अडचणी आहेत, त्यांच्या मातृसंघटनेतही अडचणी आहेत. त्यामुळे मला असे म्हणायचे आहे की नरेंद्र मोदींची संकल्पना विरोधकांनी मोडून काढली. दुसरीकडे आता खूप प्रबळ विरोधक आहेत. ही खूप मनोरंजक वेळ आहे," असं राहुल गांधी म्हणाले.
युजीसी नीट परीक्षा रद्द केल्यावरून राहुल गांधींनी नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. "भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हजारो लोकांनी पेपर फुटीबाबतच्या त्यांच्या तक्रारी माझ्याशी शेअर केल्या. मोदीजींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवल्याचे बोलले जात होते. पण काही कारणांमुळे नरेंद्र मोदी भारतात पेपरफुटी थांबवू शकले नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत," असेही राहुल गांधी म्हणाले.