केंद्रीय मंत्रिमंडळ नव्हे, तर हे परिवार मंडळ..! घराणेशाहीवर राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 06:45 AM2024-06-12T06:45:07+5:302024-06-12T06:45:40+5:30
Rahul Gandhi Criticize Modi Cabinet: तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले नवे केंद्रीय मंत्रिमंडळ हे परिवार मंडळ आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.
नवी दिल्ली - तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेले नवे केंद्रीय मंत्रिमंडळ हे परिवार मंडळ आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री हे राजकीय वारसा असलेल्या घराण्यांतून आलेले आहेत, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले व भाजपच्या घराणेशाहीच्या राजकारणावर प्रहार केले.
त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पिढ्यान्पिढ्या केलेला संघर्ष, सेवा, त्यागाच्या परंपरेला घराणेशाही म्हणणारे लोक आता त्यांच्या ‘सरकारी परिवारातील’ लोकांना सत्तेतील वाटा देत आहेत. बोलायचे एक व करायचे दुसरेच याचे उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काँग्रेस घराणेशाहीच्या राजकारणाचे समर्थन करते अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात केली होती. त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांशी निगडित असलेल्या घराणेशाहीसंदर्भात राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर टीका केली.