Rahul Gandhi Defamation Case:काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला सुरू आहे. गुजरात उच्च न्यायालय शुक्रवारी (7 जुलै) रोजी या खटल्याचा निकाल देणार आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून 23 मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. याविरोधात राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
दोषी ठरल्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवण्यात आले. यावरुन काँग्रेसने केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला होता. सदस्यत्वासाठी अपात्र ठरल्यानंतर राहुल गांधी केरळच्या वायनाडमध्ये म्हणाले होते की, केंद्र सरकार त्यांचा आवाज दाबण्याचे काम करत आहे, पण ते घाबरत नाहीत.
काय आहे प्रकरण?2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणात "मोदी हे सर्व चोरांचे आडनाव आहे" असे म्हटल्याबद्दल भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी सुरतच्या कोर्टात राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी आडनावाच्या लोकांची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला होता.