Rahul Gandhi News: मोदी आडनावावरून केलेल्या विधानामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी कुणाची हत्या केलेली नाही. निवडणूक लढवण्यावर ८ वर्षांची बंदी घालणे चुकीचे आहे. हे अति झाले, असा युक्तिवाद राहुल गांधी यांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला.
राहुल गांधी यांच्या वतीने उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. या याचिकेवरील पुढील सुनावणी आता ०२ मे रोजी होणार आहे. या याचिकेसंदर्भात सर्व तथ्ये न्यायालयासमोर सादर केली जाणार असून, ०५ मे पर्यंत याबाबतचा निकाल येऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या निर्णयावर स्थगिती देण्यात आली नाही, तर मोठा काळ निवडणूक लढण्यापासून वंचित राहावे लागेल. राजकारणात ही बाब अर्धस्थायी आहे. राजकारणात एका आठवड्याचा कालावधीही मोठा मानला जातो. मात्र, इथे थेट ८ वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यावर निर्बंध घातले जात आहेत. राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे. कोणताही गंभीर गुन्हा केलेला नाही. कोणाची हत्या केलेली नाही. कृपया याचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, अशी विनंती राहुल गांधी यांच्या वतीने न्यायालयाला करण्यात आली.
२३ मार्च रोजी सुरतच्या न्यायालयाने २०१९ मध्ये राहुल गांधींनी मोदी आडनावाबाबत केलेल्या टिप्पणीप्रकरणी निकाल दिला. न्यायालयाने कलम ५०४ अंतर्गत शिक्षा सुनावली. मात्र, अंमलबजावणीसाठी न्यायालयाकडून काही दिवसांचा अवधी मिळाला. यासोबतच त्यांना तात्काळ जामीनही मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांनी सुरत न्यायालयाने याचिकाही दाखल केल्या होत्या. त्यापैकी एका याचिकेवर ०३ मे रोजी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. चार वर्षांनंतर सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधी दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. राहुल गांधी यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"