मोदी आडनाव प्रकरणात सूरत सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर, आता राहुल गांधींचे संसदेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आता कोण उभे राहणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महत्वाचे म्हणजे, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस नेत्यांनी मिशन 2024 साठी त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करायलाही सुरुवात केली होती. मात्र राहुल यांचे सदस्यत्व गेल्याने आता सद्यस्थितीत त्यांना 8 वर्षे निवडणूक लढवता येणार नाही. अशा बिकट परिस्थितीत लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षातून पंतप्रधान मोदींना कोण टक्कर देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राहुल गांधी आता 8 वर्षांपर्यंत निवडणूक लढू शकणार नाहीत -मोदी आडनावासंदर्भातील मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत 2 अथवा त्याहून अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास संसद अथवा विधानसभेचे सदस्यत्व रद्द केले जाते. एवढेच नाही, तर शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर, 6 वर्षांपर्यंत संबंधित व्यक्ती कोणतीही निवडणूक लढवू शकत नाही. अर्थात सद्यस्थितीत राहुल गांधींना 8 वर्षांपर्यंत निवडणूक लढवता येणार नाही. खरे तर, सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला ३० दिवसांसाठी स्थगिती दिली आहे, जेणेकरून त्यांना उच्च न्यायालयात जाता यावे. आता या प्रकरणात, जर उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय निलंबित केला, तरच राहुल गांधींना काही दिलासा मिळू शकतो.
विरोधकांकडून कोन बनेल चेहरा?-खरे तर, राहुल गांधी यांचे सदस्यत्व गेल्यानंतर, आता 2024 मध्ये कुठळा नेता पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर उभा राहणार आणि त्यांना आव्हान देणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या शर्यतीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांचे नाव पुढे येऊ शकते. याशिवाय, आता बऱ्याच दिवसांपासून होत असलेल्या तिसऱ्या आघाडीच्या मागणीलाही गती मिळू शकते.
तिसरी आघाडी देईल मोदींना आव्हान? -खरे तर, ममता या तिसऱ्या आघाडीच्या नैसर्गिक नेत्या आहेत. पण अशा परिस्थितीत 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठीचे दावेदार नेते ममतांना समर्थन देणार का? हा खरा प्रश्न आहे. याशिवाय, काँग्रेस विरोधी पक्षातील कोणत्या नेत्याला पाठिंबा देते? हाही एक प्रश्नच आहे. यामुळे, नीतीश, ममता, के चंद्रशेखर राव की शरद पवार यांपैकी, पंतप्रधान मोदींना कोण टक्कर देणार हे काळच ठरवेल...