काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्सला भेट दिली. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांकडून तेथील व्यवस्थेची विचारपूस केली. त्यांनी केंद्र आणि दिल्ली सरकारवर रुग्णांप्रती असंवेदनशील असल्याचा गंभीर आरोप केला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा एम्सच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
"एम्सच्या बाहेर नरक! देशभरातील गरीब रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना एम्सच्या बाहेर थंडी, घाण आणि उपासमारीत झोपायला भाग पाडलं जात आहे. त्यांच्याकडे छप्पर नाही, अन्न नाही, शौचालय नाही आणि पिण्याचे पाणी नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच व्हिडिओमध्ये "मला खूप राग येत आहे. २१ व्या शतकात लोक असं खोटं बोलत आहेत. येथे लोक त्रास सहन करत आहेत आणि मरत आहेत हे पूर्णपणे निराशाजनक आहे" असं म्हटलं आहे. उपस्थित असलेल्या रुग्णांनीही राहुल गांधींना त्यांच्या समस्या सांगितल्या.
एम्सला भेट दिल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर म्हटलं होतं की, "आजाराचं ओझं, कडक थंडी आणि सरकारी असंवेदनशीलता. केंद्र आणि दिल्ली दोन्ही सरकारे जनतेप्रती असलेली त्यांची जबाबदारी पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहेत. परिस्थिती खूप वाईट आहे. हे ते लोक आहेत जे दूरदूरहून आपल्या प्रियजनांच्या आजाराचं ओझं वाहून आले आहेत आणि या गोठवणाऱ्या थंडीत फूटपाथ आणि सबवेवर झोपण्यास त्यांना भाग पाडलं जात आहे."
एका रुग्णाने राहुल गांधींना सांगितलं की, "काही बिहारहून आले आहेत तर काही उत्तर प्रदेशातून. आम्ही येथे थंडीत मरत आहोत. आम्हाला पिण्याचे पाणी आणि अन्न मिळत नाहीये. गेल्या १५ दिवसांपासून डॉक्टर आम्हाला इकडून तिकडे पाठवत आहेत. सकाळी ६ वाजता आम्हाला हॉस्पिटलमधून बाहेर काढलं जातं." यानंतर राहुल गांधी म्हणाले की, आम्ही फक्त तुम्हा सर्वांना मदत करण्यासाठी येथे आलो आहोत.