अहमदाबाद - केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) कपात करत दिलासा देण्याचा निर्णय घेतला असला तरी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र आपली नाराजी कायम ठेवली आहे. राहुल गांधी यांनी जीएसटीच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा केंद्र सरकारला धारेवर धरत जीएसटीचा 'गब्बर सिंह टॅक्स' असा उल्लेख केला आहे. राहुल गांधी तीन दिवसांच्या गुजरात दौ-यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झाले असून, यावेळी त्यांनी 28 टक्के करातून काही वस्तू आणि सेवांना वगळण्यात आली ही चांगली गोष्टी असल्याचं सांगितलं. पण संपुर्ण देशात टॅक्सचा एकच दर असला पाहिजे अशी मागणीही केली.
राहुल गांधी बोलले आहेत की, 'भाजपाने जो टॅक्स दिला आहे, तो गब्बर सिंह टॅक्स आहे. आम्हाला असा टॅक्स नको. देशाला जीएसटी हवा आहे म्हणजे 18 टक्के टॅक्स कॅप असला पाहिजे. पाच टॅक्स नकोत. आम्हाला सिंपल टॅक्स हवा आहे'. पुढे ते बोलले की, 'काँग्रेस पक्ष आणि देशातील जनतेने भाजपावर दबाव टाकला आणि 28 टक्के कर असणा-या अनेक गोष्टी 18 टक्क्यांवर आणल्या ही चांगली गोष्ट आहे. पण आम्ही अजून आनंदी नाही, आम्ही थांबणार नाही. भारताला पाच वेगवेगळे टॅक्स नकोत, एकच टॅक्स हवा आहे. जीएसटीत संरचनात्मक बदल हवा आहे'.
काँग्रेसने सुरुवातीपासून जीएसटी किमान 18 टक्के ठेवण्याची मागणी केली आहे. सध्या जीएसटीत 5%, 12%, 18% आणि 28% असे चार स्लॅब आहेत. महत्वाचं म्हणजे शुक्रवारी गोव्यात पार पडलेल्या जीएसटी काऊन्सिलच्या 23 व्या मीटिंगमध्ये सामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. च्युइंगपासून चॉकलेट, सौंदर्य उत्पादने, केसांचे टोप आणि मनगटी घड्याळे, फर्निचर, दुचाकी, तीनचाकी तसेच ट्रॅक्टरचे टायर्स अशा वस्तूंसह १७८ वस्तूंवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यामुळे या वस्तू आता स्वस्त होणार आहेत. केवळ ५० वस्तूंवरच आता २८ टक्के जीएसटी ठेवला असल्याचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत जीएसटीमध्ये केलेला हा सर्वांत मोठा बदल आहे.
गुजरात दौ-याच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधींनी अहमदाबादमधील अक्षरधाम मंदिराचं दर्शन घेतलं. काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अक्षरधाम मंदिराचा दौरा केला होता. याआधी राहुल गांधींनी ट्विट करत जीएसटीच्या मुद्द्यावरुन सरकारला घेरलं होतं. 'आम्ही भाजपाला भारतात गब्बर सिंह टॅक्स लादू देणार नाही. छोट्या व्यवसायिकांची पाठ ते मोडू शकत नाहीत. लाखो नोक-या ते घालवू शकत नाहीत', असं ट्विट राहुल गांधींनी केलं होतं.