नवी दिल्ली: यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या लोकसभेतील खासदारांची बैठक झाली. या बैठकीला राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी पक्षाच्या 51 खासदारांनी राहुल यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मात्र राहुल यांनी अध्यक्षपदी राहण्यास नकार दिला. राहुल गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदी कायम राहावं, अशी मागणी खासदारांनी केली. लोकसभा निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असल्याचं काँग्रेस खासदार शशी थरुर आणि मनीष तिवारी यांनी म्हटलं. त्यावर पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याचं राहुल म्हणाले. यानंतर बैठकीला उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या सर्व 51 खासदारांनी राहुल यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मात्र राहुल राजीनाम्यावर ठाम राहिले. युवक काँग्रेसच्या सदस्यांनी राहुल गांधींच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी करत राजीनामा मागे घेण्याचा आग्रह केला. राहुल यांनी अध्यक्षपदी कायम राहण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. मात्र राहुल यांनी राजीनामा मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या कार्यकारणीची बैठक झाली होती. त्यामध्ये राहुल गांधींनी अध्यक्षपद सोडणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर तुम्हाला पर्याय असू शकत नाही, असं मत व्यक्त करत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राहुल यांचा राजीनामा फेटाळून लावला होता.