राहुल गांधी चुकीचं बोलले नाहीत, सत्ताधाऱ्यांचा संसदेत नंगानाच; संजय राऊतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 11:52 AM2023-03-14T11:52:13+5:302023-03-14T11:53:33+5:30
सरकारी कर्मचारी संपावर जातायेत, शेतकरी लॉंग मार्च काढतायेत याचा अर्थ महाराष्ट्रात खदखद आहे असंही संजय राऊत म्हणाले.
नवी दिल्ली - या देशात लोकशाहीची रोज हत्या होते. राहुल गांधी काही चुकीचे बोलले नाहीत. राज्यसभेत काल बोलताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंचा माईक बंद केला. आम्हाला बोलू दिले जात नाही. ही लोकशाहीची गळचेपी नाही का? असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, या देशातील संसदेत आणि संसदेबाहेर राजकीय विरोधकांना संपवण्याचा डाव सुरू आहे त्याविरोधात व्यासपीठ मिळाल्यावर राहुल गांधी बोलले. संसदेत कालच्या गोंधळाला सुरुवात कुणी केली ते पाहा. राहुल गांधीनिमित्त आहे. गौतम अदानी आणि मोदी संदर्भावर चर्चा घडू नये यासाठी दोन्ही सभागृहात सत्ताधारी पक्षाने नंगानाच केला असा घणाघात त्यांनी भाजपावर केला.
ही लढाई अन्यायाविरोधात, जनता रस्त्यावर उतरलीय
सरकारी कर्मचारी संपावर जातायेत, शेतकरी लॉंग मार्च काढतायेत याचा अर्थ महाराष्ट्रात खदखद आहे. जनतेच्या मनातील सरकार असते तर रस्त्यावर जनता उतरली नसती. जनतेच्या विरोधात हे सरकार आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेली ही सत्तासंघर्षाची लढाई नाही. ज्यांनी आमच्यावर डाका, दरोडा घातलाय आणि त्याला केंद्र सरकारने पाठिंबा दिलाय त्या अन्यायाविरोधात ही सुनावणी आहे. दोन्ही बाजूचे युक्तिवाद संपलेला आहे. या आठवड्यात निकाल लागायला हरकत नाही असं संजय राऊतांनी सांगितले.
हे तर योद्ध्यांचे कर्तव्य
सुभाष देसाई हे आदर्श नेते आहेत. त्यांनी काल स्पष्ट केले आहे. त्यांच्या मुलाने पक्षप्रवेश केल्याने काही फरक पडत नाही. मिंदे गटाला आनंद वाटतोय पण ही ओझी पुढे काय करायचं हा प्रश्न आहे. ही वॉशिंग मशिन बिघडेल इतका कचरा भाजपा आत टाकताय. प्रवेश होऊ द्या अजून काही होऊ द्या. त्यामुळे शिवसेना वाढीवर, विस्तारावर, जनमानसावर काही परिणाम होणार आहे. संघर्षात उतरल्यानंतर अशा प्रसंगाला सामोरं जाणं हे योद्धाचं कर्तव्य असते. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही त्यासाठी तयार आहोत असं सांगत राऊतांनी भूषण देसाईंच्या शिवसेना प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.