नवी दिल्ली, दि. 8 - गुजरातमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीवर बोलताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींनी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळले नसल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधींनी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळले नाहीत, मात्र त्यांच्या खासगी सचिवाने नियम पाळले अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. राहुल गांधी यांनी शुक्रवारी गुजरातच्या पूरग्रस्त भागाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्या कारवर एक वीट फेकली आणि काळे झेंडे दाखवण्यात आले. या हल्ल्यात राहुल यांच्या कारच्या काचा फुटल्या होत्या. त्यामुळे सभा लवकर आटोपून ते तेथून निघून गेले.
'तिथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा ठेवण्यात आली होती. सुरक्षेचा मोठा फौजफाटा ठेवण्यात आला होता. राहुल गांधी यांनी पोलिसांनी दिलेली कार न घेता बुलेटप्रूफ नसलेली कार सोबत घेऊन प्रवास सुरु केला. त्यांनी सुरक्षेसंबिधित सूचनांचं पालन करण्याची गरज होती', असं राजनाथ सिंह लोकसभेत बोलले आहेत.
यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करताना त्यांच्या परदेश दौ-यावर प्रश्न उपस्थित केले. 'गेल्या दोन वर्षात राहुल गांधी यांनी सहा वेळा परदेश दौरा केला असून 72 दिवस देशाबाहेर होते. त्यांनी यावेळी एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) कव्हर घेतला नाही. ते कुठे गेले होते याची आम्हाला माहिती हवी आहे ? त्यांनी एसपीजी सुरक्षा का घेतली नाही ?', असे प्रश्न राजनाथ सिंह यांनी उपस्थित केले.
यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी गुजरात सरकारने केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. चांगली कामगिरी करत हल्ला करणा-या एका व्यक्तीला अटक केल्याप्रकरणी राजनाथ सिंह यांनी राज्य सरकारची स्तुती केली.
काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी राहुल गांधींवर झालेल्या मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता. 'काश्मीरमध्ये दहशतवादी दगडफेक करतात असं सरकारचं म्हणणं आहे, तर मग कोणत्या दहशतवाद्यांनी गुजरातमध्ये दगडफेक केली ?', असा उपरोधिक प्रश्न विचारला. काँग्रेस नेत्यांनी या मुद्यावरुन गदारोळ घातल्यानंतर लोकसभेचं कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित करण्यात आलं होतं.
4 ऑगस्ट रोजी राहुल गांधी पूरग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी गुजरातमध्ये होते. यावेळी त्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. राहुल गांधी हल्ल्यातून सुखरुप बाहेर पडले होते. ट्विटरुन त्यांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट करत हल्ल्याचा निषेध केला होता.
याबाबत राहुल गांधी म्हणाले होते की, भाजप कार्यकर्त्यांनी माझ्या दिशेने एक मोठा दगड मारला. तो माझ्या सुरक्षा अधिका-याला लागला. मोदी आणि आरएसएस यांची राजकारण करण्याची ही पद्धत आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपाने या हल्ल्याचा निषेध केला नाही, असे विचारले असता राहुल गांधी म्हणाले की,असे प्रकार करणारे स्वत:च त्याचा निषेध कसा काय करतील?