हाथरस : हाथरस गँगरेप प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आज प्रसारमाध्यमांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राजकीय व्यक्तींना परवानगी दिलेली नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज पुन्हा हाथरसला जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी टीका केली आहे. राहुल गांधी केवळ राजकारण करतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी या प्रकरणी काहीच अवाक्षर न काढल्याने त्यांच्यावर विरोधी पक्ष टीका करत होते. यावर आता इराणी यांनी वाराणसीमध्ये पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधी हे नेहमी राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, देशाच्या नितीमध्ये नरेंद्र मोदी सफल होतात. मला वाटते की देशाची जनता काँग्रेसचे हे प्रकार ओळखते. कोणताही नेता कोणत्याही विषयात राजकारण करू इच्छित असेल तर मी त्याला रोखू शकत नाही. लोकांना माहिती आहे, हाथरसला जाणे त्याच्या राजकारणासाठी आहे. पीडितेला न्याय देण्यासाठी नाही, अशी टीक केली आहे.
मला मर्यादा असल्याने मी कोणत्याही राज्यातील प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र, मी मुख्यमंत्र्यांसोबत बोलले आहे. त्यांनी एसआयटी बनविली आहे. कालच एसपींविरोधात कारवाई झाली आहे. एसआयटीचा अहवाल येऊ दे. त्यानंतर ज्या लोकांनी हस्तक्षेप केला किंवा पीडितेला न्याय देण्यामध्ये बाधा आणली त्यांच्याविरोधात योगी कडक कारवाई करतील, असे आश्वासनही इराणी यांनी दिले. तसेच राहुल गांधी यांनी गहलोत सरकारलाही फोन करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
राहुल गांधी पुन्हा हाथरसला जाणारकाँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी गुरुवारी हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले होते. मात्र पोलिसांनी दोघांनाही यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवण्यात आले होते. याचदरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 जणांविरोधात FIR दाखल केली आहे. मात्र आज पुन्हा राहुल गांधी मोटारसायकलवरुन हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाणार असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून हाथरसमधील बलात्कार पीडितेच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. याचदरम्यान राहुल गांधी आज दुपारी पुन्हा हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी प्रयत्न करणार आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे काही खासदार देखील सहभागी होणार असल्याची माहिती कॉंग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे.