राहुल गांधींनी वायनाडला दिले १७५ स्मार्ट टीव्ही; आदिवासी विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 01:06 AM2020-07-03T01:06:00+5:302020-07-03T01:06:46+5:30
केरळमध्ये १ जूनपासूनच ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात झाली. फर्स्ट बेल असे या शिक्षणपद्धतीला नाव देण्यात आले आहे. पण अनेक आदिवासी विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट वा अन्य कोणतेच साधन नसल्याचे राहुल गांधी यांच्या लक्षात आले
वायनाड (केरळ) : कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा सुरू करणे शक्य नसल्याने केरळ सरकारने आॅनलाइन शिक्षण सुरू केले असून, ते घेण्यात आदिवासी विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये, यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाडमधील कलपेट्टामध्ये १७५ स्मार्ट टीव्ही दिले आहेत. राहुल गांधी वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
केरळमध्ये १ जूनपासूनच ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात झाली. फर्स्ट बेल असे या शिक्षणपद्धतीला नाव देण्यात आले आहे. पण अनेक आदिवासी विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन, इंटरनेट वा अन्य कोणतेच साधन नसल्याचे राहुल गांधी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी स्मार्ट टीव्ही देण्याचा निर्णय घेतला. हे १७५ स्मार्ट टीव्ही ही तात्पुरती सोय आहे. प्रत्यक्षात त्या आदिवासी विद्यार्थ्यांना संगणक, स्मार्टफोन, केबल टीव्ही, इंटरनेट कनेक्शन दिले जाणे गरजेचे आहे. तसे केले, तरच या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय होईल, असे राहुल गांधी यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या नव्या शिक्षणपद्धतीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच सुटू नये, यासाठी ही सोय करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जे लागेल, ते कळवावे, तशी सोय आपण करू, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही कळविले आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण सुरू केलेली फर्स्ट बेल योजना अतिशय चांगली आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांकडे ज्या वस्तू असायला हव्यात, त्यांचीही व्यवस्था करायला हवी. त्यासाठी आपण हे पाऊ ल उचलले आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
याआधी त्यांनी आपल्या वाढदिवशी विद्यार्थ्यांसाठी ५0 टीव्ही संच दिले होते. मल्लपूरम व कोळीकोड येथील विद्यार्थ्यांसाठीही त्यांनी १00 स्मार्टफोनची व्यवस्था याआधी करून दिली.