Rahul Gandhi : नवी दिल्ली : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. राहुल गांधी यांनी आपलं एक महिन्याचं वेतन वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी दिलं आहे.
भूस्खलनग्रस्तांच्या मदतीसाठी राहुल गांधी यांनी एक महिन्याचं वेतन म्हणजेच २.३ लाख रुपये केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या खात्यात दान स्वरूपात दिलं आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरील एक्सवर पोस्टही शेअर केली आहे. वायनाडमधील आपले बंधू आणि भगिनी एका विनाशकारी शोकांतिकेचा सामना करत आहेत, असं राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिले आहे.
याचबरोबर, या संकटाच्या काळात भूस्खलनग्रस्तांचे मोठं नुकसान झालं आहे. त्यांना आमच्यासारख्या लोकांच्या मदतीची नितांत गरज आहे. वायनाडच्या भूस्खलनग्रस्तांना त्यांच्या नुकसानातून सावरण्यासाठी आमच्या पाठिंब्याची गरज आहे, असं राहुल गांधी यांनी लिहिलं आहे. तसंच, मी बाधित लोकांच्या मदत आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांसाठी माझे संपूर्ण महिन्याचे वेतन दान केलं आहे, असंही राहुल गांधी यांनी लिहिलं आहे.
देशातील जनतेला मदतीचं आवाहनयासोबतच राहुल गांधींनी देशातील सर्व जनतेला मदतीचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, मी देशातील प्रामाणिक आणि संवेदनशील बांधवांना या संकटात जमेल ते योगदान देण्याचं आवाहन करतो. वायनाड हा आपल्या देशाचा एक सुंदर भाग आहे आणि आपण मिळून इथल्या लोकांना त्यांचे जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करू शकतो. येथील आपत्तीत लोकांचे खूप नुकसान झालं आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसकडून नऊ सदस्यांची समितीदरम्यान, वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांसाठी केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने मदतीची रक्कम गोळा करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. यासाठी केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने एक ॲपही तयार केले आहे. तसेच, केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीने सांगितले आहे की, या ॲपद्वारे इच्छुक लोक थेट देणगी पाठवू शकतात.
३० जुलैला झाले होते भूस्खलन गेल्या ३० जुलै रोजी केरळमधील वायनाड येथे भूस्खलन झाले होते. त्यामुळे मोठी हानी झाली. या भूस्खलनाच्या दुर्घटनेत २०० जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, अनेक लोक बेपत्ताही झाले होते. भूस्खलनामुळे येथील काही गावे बाधित झाली होती. या दुर्घटनेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाडमध्ये जाऊन पाहणी केली होती. तसेच, या दुर्घटनेत बेघर झालेल्या लोकांना १०० घरे बांधून देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले होते.