नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. 'अर्थव्यवस्था की बात' या व्हिडीओ मालिकेतून राहुल यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. "मोदीजींचा कॅशमुक्त भारत म्हणजे मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी मुक्त भारत आहे" तसेच "नोटबंदीचा श्रीमंत उद्योगपतींना फायदा, गरीब-मजुरांवर सर्वात मोठा हल्ला" असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
"मोदीजींचा कॅशमुक्त भारत म्हणजे मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी मुक्त भारत आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी हा फासा टाकण्यात आला होता, त्याचा भयंकर परिणाम 31 ऑगस्ट 2020 रोजी समोर आला आहे. जीडीपी घसरण्याबरोबरच नोटबंदीनं देशाची असंघटीत अर्थव्यवस्था तोडली" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच "500-1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या. संपूर्ण भारत बँकांसमोर जाऊन रांगेत उभा राहिला. काळा पैसा नष्ट झाला का?, भारतातील गरीब जनतेला नोटबंदीमुळे कोणता फायदा झाला? या दोन्ही प्रश्नांचं उत्तर नाही."
"नोटबंदीचा श्रीमंत उद्योगपतींना फायदा झाला आहे. सामान्य जनतेचा पैसा त्यांच्याकडून काढून त्याचा उपयोग सरकारने या लोकांची कर्ज माफ करण्यासाठी केला. यामध्ये दुसरा छुपा उद्देशही होता. देशातील जी असंघटीत अर्थव्यवस्था आहे, ती कॅशवर चालते. छोटे दुकानदार, मजूर, शेतकरी हे रोखीचे व्यवहार करतात. या क्षेत्रातून रोख पैसा काढून घेणं हाच दुसरा उद्देश होता. पंतप्रधानांनी स्वतः सांगितलं की त्यांना कॅशलेस भारत हवा आहे. छोटे व्यावसायिक, मजूर, शेतकरी यांचं नुकसान झालं. नोटबंदी भारतातील गरीब, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांच्यावरील आक्रमण होतं. संपूर्ण देशाला यांच्याविरोधात लढावं लागेल" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
"मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं", 'या' सहा मुद्दांवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
राहुल गांधी यांनी याआधीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'मोदी मेड डिझास्टर' म्हणजेच मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली संकटं असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलं. राहुल गांधी यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या संकटांमुळे देश अडचणीत असल्याचं म्हटलं आहे. या सोबत सहा मुद्दे सांगितले आहेत. 23.9 टक्क्यांनी घटलेला जीडीपीचा दर, 45 वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारीचा दर, 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, केंद्र सरकारने राज्यांना जीएसटीची रक्कम न देणे, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणि मृत्यूमध्ये दररोज होणारी वाढ आणि भारताच्या सीमावर शेजारच्या देश करत असलेली घुसखोरी या गोष्टींचा त्यामध्ये समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बापरे! तरुणीच्या पोटात होता तब्बल 7 किलो केसांचा गोळा, डॉक्टरही झाले हैराण
CoronaVirus News : नवा उच्चांक! गेल्या 24 तासांत तब्बल 83,883 नवे रुग्ण, 38 लाखांचा टप्पा केला पार
"सुशांतच्या मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप भाजपाला महागात पडेल"
"केंद्र सरकार 'हा' निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही", ममता बॅनर्जींचा हल्लाबोल