Rahul Gandhi: 3 वर्षात 76 टक्क्यांनी वाढले खाद्यतेलाचे दर, राहुल गांधींनी तक्ताच केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 04:43 PM2022-08-02T16:43:13+5:302022-08-02T16:51:59+5:30
राहुल गांधींनी गेल्या 3 वर्षांत महागाईत किती पटीने, किती टक्क्यांनी वाढ झाली याची आकडेवारीच शेअर केली आहे.
नवी दिल्ली- देशात वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना महामारीमुळे अगोदरच लोकांच्या उत्पन्नात घट झाली होती. त्यातच, खाद्यपदार्थांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू महागल्या आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बरेच दिवसच चाललेल्या तिढ्यानंतर सोमवारी अखेर महागाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. यावेळी विरोधकांनी महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. आता, खासदार राहुल गांधी यांनी महागाईच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.
राहुल गांधींनी गेल्या 3 वर्षांत महागाईत किती पटीने, किती टक्क्यांनी वाढ झाली याची आकडेवारीच शेअर केली आहे. महागाई नाहीच म्हणणाऱ्या अर्थमंत्र्यांना आणि केंद्र सरकारला त्यांनी आकडेवारी जारी करत उत्तर दिलं आहे. तसेच, ''अमृतक्षणाच्या धुंदीत असलेल्या भाजप सरकारने संसेदत महागाई नसल्याचे सांगितले. मात्र, यांच्या डोळ्यावर अहंकाराची पट्टी बांधली आहे, त्यांना महागाई कशी दिसेल. मित्रांना फ्री फंडातून देशाची संपत्ती विकली जात आहे'', अशी टीका राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
राहुल गांधींनी ट्विटवरुन एक तक्ता शेअर केला आहे. त्यामध्ये, गेल्या 3 वर्षात इंधन आणि अन्नधान्याच्या किंमतीत झालेली वाढ दर्शवली आहे. त्यानुसार, 2019 च्या तुलनेत तेलाच्या किंमतीत तब्बल 76 टक्क्यांची वाढ झाली असून 92 रुपये किलो वाले सोयाबीन तेल 162 रुपये किलोवर पोहोचले आहे. तर, 2019 मध्ये 73 रुपये लिटर असणारे पेट्रोल 97 रुपयांवर पोहोचले आहे. एलपीजी गॅसच्या किंमती सर्वात अधिक पटीने महागल्या आहेत. 2019 मध्ये 494 रुपयांना असणार एलपीजी 1053 रुपयांना विकत घ्यावा लागत आहे.
अमृतकाल के जश्न में मगन भाजपा सरकार ने सदन में कह दिया कि, देश में महंगाई है ही नहीं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 2, 2022
ख़ैर, इन्हें महंगाई दिखाई कैसे देगी? आंखों पर अहंकार की पट्टी बांध कर, 'मित्रों' को 'Free Fund' में देश की संपत्ति जो बेच रहे हैं। pic.twitter.com/jXRHbnVY6t
दरम्यान, महागाईवरुन संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण वैशिष्यपूर्ण ठरले. सुप्रिया सुळेंनी दत्त.. दत्त.. दत्ताची गाय या कवितेच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारने दत्त आणि गाय सोडून सगळ्यावर जीएसटी लावलाय, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. आपल्या खिशातून काय जातंय आणि त्याबदल्यात आपल्याला काय मिळतंय, हीच भाषा सर्वसामान्यांना समजते. मोदी सरकारने कशा कशावर जीएसटी लावलाय हे मी तुम्हाला सांगते. आज मी मराठीतील एक कविता वाचून दाखवते. दत्त दत्त, दत्ताची गाय, गाईचं दूध, दुधाची साय, साईचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप. ही कविता ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो. यातील दत्तगुरू भगवान आणि गाय या दोघांना सोडून सर्वांवर मोदी सरकारने जीएसटी लावला आहे. सुदैवाने देवावर जीएसटी लावलेला नाही. जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंवर केंद्र सरकारने जीएसटी लावलाय, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
महागाईबाबत काय म्हणाल्या अर्थमंत्री
संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना देशातील महागाई ही ९ वेळा दुहेरी आकड्यांमध्ये राहिली. २२ महिने किरकोळ महागाईचा दर ९ टक्क्यांपेक्षा अधिक होता. आमचे सरकार महागाईला ७ टक्क्यांच्या खाली आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत सोमवारी सांगितले. मात्र त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला.