केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला सत्तेतून हटवून यूपीएचं सरकार स्थापन करण्यासाठी देशभर प्रचार करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'लोकमत' समूहाचे प्रतिनिधी शीलेश शर्मा यांना विशेष मुलाखत दिली आहे. काँग्रेसची 'न्याय' योजना, महाआघाडीचा प्रयोग, प्रियंका गांधींचा सक्रिय सहभाग, वायनाडमधून निवडणूक लढण्याचं कारण, बालाकोटमधील जवानांच्या पराक्रमाचं होत असलेलं राजकारण, यावर त्यांनी आपली मतं मांडली. जम्मू-काश्मीरबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना, राहुल गांधींनीनरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केला. मोदींनी राजकीय लाभासाठी पीडीपीबरोबर युती केली. ही युती होताच त्यांनी दहशतवाद्यांसाठी स्वत: जम्मू-काश्मीरची दारे उघडून दिली, असा टीकास्त्र त्यांनी सोडलं.
प्रश्नः काश्मीरमधील स्थिती वाईट आहे. काश्मीरची स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काय कराल?
उत्तरः आम्ही २००४ ते २०१४ पर्यंत जम्मू-काश्मीरवर रणनीतीनुसार काम केले. टॅक्टिकल काम नाही. फसवाफसवी नाही. जम्मू-काश्मीर हिंदुस्थानसाठी खूपच महत्त्वाचे आहे. आम्ही लक्षावधी महिलांना बचत गटांद्वारे बँकांना जोडले, सगळ्यात मोठे उद्योगपती रतन टाटा यांना श्रीनगरला घेऊन गेलो. मला हे दाखवायचे होते की हा हिंदुस्थान आहे. पंचायत राज निवडणुका घेतल्या आणि अतिरेक्यांची जागाच नाहीशी केली. जनतेशी संवाद साधला. दहशतवादाबाबत झीरो टॉलरन्स धोरण राबवले. अतिरेकी हिंदुस्थानच्या लोकांना ठार मारत असतील तर झीरो टॉलरन्स. एक सेकंदही दहशतवाद सहन करणार नाही. जम्मू-काश्मीरच्या जनतेला सर्वांशी जोडू. मोदींनी राजकीय लाभासाठी पीडीपीबरोबर युती केली. ही युती होताच मोदी यांनी दहशतवाद्यांसाठी स्वत: जम्मू-काश्मीरची दारे उघडून दिली.
अरुण जेटली माझ्या घरी एके दिवशी आले असताना त्यांना मी म्हटले की, हे तुम्ही हिंदुस्थानचे फार मोठे व्यूहरचनात्मक नुकसान करीत आहात. त्यावर जेटली म्हणाले, तुम्हाला माहिती आहे की काश्मीरमध्ये काय सुरू आहे. मी म्हणालो, काश्मीरमध्ये आग लागणार आहे. ते म्हणाले, कोणतीही आग लागणार नाही. सगळे कसे शांत शांत आहे. मी त्यांना विचारले, तुम्ही काश्मीरमध्ये किती लोकांशी बोलला आहात? माझे म्हणणे हे आहे की राजकीय संधीसाधूपणामुळे काश्मीरची खूपच हानी झाली आहे. २००४ ते २०१४ दरम्यान आमचे जे धोरण होते ते यशस्वी होते. तुम्ही स्वत: म्हणाला आहात की, २०१४ मध्ये दहशतवाद संपला आहे. श्रीनगरला ५० विमान उड्डाणे व्हायची. पण मोदी व्यवस्थितरीत्या काहीही करीत नाहीत.
प्रश्नः बालाकोटमधील जवानांची कारवाई आणि पुलवामातील जवानांच्या हौतात्म्याच्या नावाने पंतप्रधान मोदी मते मागत असल्याचा आरोप तुम्ही करीत आहात..?
उत्तरः हा प्रकार घृणास्पद आहे. यातून अशा व्यक्तीची संवदेनशीलताच नष्ट झाल्याचे दिसते. आमची सशस्त्र दले राजकारणापेक्षाही श्रेष्ठ आहेत. त्यांचा सन्मान राखायलाच हवा. राजकीय भाषणात त्यांचा उल्लेख होऊ नये. केवळ मते लाटून सत्ता काबीज करण्यासाठी काही जण त्यांचा वापर करीत आहेत. पुलवामा आणि बालाकोटनंतर सर्व विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी होते. काही बाबी राजकारणापेक्षा महत्त्वाच्या असतात; परंतु, पंतप्रधान मोदी व भाजपने काय केले, हे सर्वश्रुत आहे. त्यांनी याला राजकीय रंग दिला आणि विरोधी पक्षांवर टीका करण्यासाठी हत्यार बनविले. आमचे बंधू असलेले जवान पुलवामात शहीद झाले; तर दुसरीकडे जवानांनी बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला. जवानांचे श्रेय हिसकावून मते लाटण्यासाठी त्याचा वापर करायचा, हा मोदींचा प्रकार चुकीचा आहे.
प्रश्नः संपूर्ण देशाची विभागणी केल्याचा आरोप तुम्ही करत असता...
उत्तरः होय. या देशाची विभागणी दोन भागांत केली गेली आहे. त्यात एकीकडे १५-२० सर्वात श्रीमंत लोक़ अनिल अंबानी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यासारखे लोक आणि दुसरीकडे उर्वरित देश. देशाचे दोन भाग झाले आहेत. त्यामागे लॉजिक असे आहे की, १५ ते २0 लोक लाखो कोटी रुपये भारतातून घेतात. या १५-२0 लोकांचे नेते नरेंद्र मोदी आहेत. नीरव मोदी, मेहुल चोकसी, अनिल अंबानी आणि विजय मल्ल्या यांच्यासोबत माझे फोटो कधी आपण पाहिले आहेत का? मात्र पंतप्रधान या लोकांना गळ्याशी धरतात. त्यांचे काही तरी नाते जरूर आहे.
राहुल गांधी यांची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी क्लिक करा!