नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधींनीकाँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र राहुल यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या एकाही नेत्यानं राजीनामा दिलेला नाही. याबद्दल राहुल यांनी पहिल्यांदाच उघडपणे नाराजी व्यक्त केली. मी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊनही काँग्रेसची सत्ता असलेल्या काही राज्यांचे मुख्यमंत्री, महासचिव, प्रभारी आणि वरिष्ठ नेते पद सोडायला तयार नाहीत. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव नाही, अशा शब्दांमध्ये राहुल यांनी युवक काँग्रेसच्या बैठकीत त्यांची नाराजी बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर 25 मे रोजी राहुल यांनी काँग्रेस कार्यकारणीची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दोन्ही राज्यात सत्ता असूनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा उडाला. आता राहुल यांनी पुन्हा एकदा या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केल्यानं गेहलोत आणि कमलनाथ यांच्यावरील दबाव वाढला आहे. राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर कमलनाथ यांनी याबद्दल भाष्य केलं. 'राहुल गांधींचं विधान योग्य आहे. यासाठी कोण जबाबदार आहे, याची मला कल्पना नाही. मात्र मी आधीच राजीनामा देऊ केला होता. होय, मी पराभवासाठी जबाबदार आहे. पण दुसऱ्या नेत्यांबद्दल मला काहीही माहीत नाही,' असं कमलनाथ म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील 29 जागांपैकी केवळ एक जागा जिंकण्यात काँग्रेसला यश आलं. तर 25 जागा असलेल्या राजस्थानात काँग्रेसची पाटी कोरी राहिली. या दोन राज्यांमद्ये गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात काँग्रेसनं भाजपाला पराभव केला होता.
राहुल गांधींच्या 'त्या' विधानामुळे मध्य प्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री राजीनामा देणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 12:43 PM