नवी दिल्ली - राफेल प्रकरणात फेरविचार याचिकेवर दिलेल्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केलेल्या 'चौकीदार चोर है' या वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारात येणाऱ्या विषयांवर ओघात आपण 'चौकीदार चोर है' असे शब्द प्रयोग केले, मात्र ते चुकीच्या अर्थाने घेतले गेले असे स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाला दिले आहे.
राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है हे वक्तव्य मी राजकीय प्रचाराच्या ओघात केले आहे. मात्र माझ्या राजकीय विरोधकांनी त्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढलेला आहे. मी हे वक्तव्य जाणूनबुजून, हेतुपुरस्सर केले असल्याची तक्रार त्यांनी सुप्रीम कोर्टात केली आहे. मात्र तसे काहीही माझ्या मनात नाही' असे स्पष्टीकरण दिले आहे.
चौकीदार चोर है' या राहुल गांधी याच्या वक्तव्याविरोधात भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सुप्रीम कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला होता. राहुल यांचे वक्तव्य पूर्वग्रहदूषित असल्याचे लेखी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या याचिकेवर सोमवारी (21 एप्रिल) सुनावणी झाली. चौकीदार चोर है, हे सुप्रीम कोर्टानेही मान्य केलं आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. मोदी हे चोर आहेत आणि त्यांनी अनिल अंबानी यांना 30 हजार कोटी दिले, अशी टिप्पणीही राहुल गांधींनी केली होती. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपाने आक्षेप घेतला होता.