Rahul Gandhi on Mohan Bhagwat Constitution Remarks: राम मंदिर प्रतिष्ठापणेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. हिंदू तिथीनुसार राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रसंगी सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं. यानंतरआता लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोहन भागवत यांच्या स्वातंत्र्यावरील वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला. मोहन भागवत यांनी संविधानाचा अपमान केल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
काँग्रेसच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी राहुल गांधी बोलत होते. यावेळी मोहन भागवत यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरुन केलेल्या विधानावर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी त्यांच्यावर तीव्र हल्ला चढवला. मोहन भागवत यांनी संविधानावर हल्ला केला आहे. हा देशद्रोह आणि संविधानाचा अपमान आहे, असं राहुल गांधी म्हणाले. निवडणूक पारदर्शकतेने पार पाडणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र, हरियाणा निवडणुकीची आकडेवारी देण्याची जबाबदारी आयोगाची आहे, मात्र ते आम्हाला डेटा देण्यास नकार देत आहेत, असंही राहुल गांधी म्हणाले.
मोहन भागवतांवर कारवाई झाली असती - राहुल गांधी
"मला वाटते की कालच संघ प्रमुखांनी १९४७ मध्ये भारताला कधीच स्वातंत्र्य मिळाले नाही असं म्हणणं हे अगदी प्रतीकात्मक आहे. ते म्हणाले की, खरे स्वातंत्र्य राम मंदिर बांधले तेव्हाच मिळाले. मोहन भागवत यांनी काल संविधान आपल्या स्वातंत्र्याचे प्रतिक नसल्याचे सांगतानाच त्यावर हल्ला चढवला. मोहन भागवत यांनी स्वातंत्र्य चळवळ आणि राज्यघटनेबद्दल आपले मत राष्ट्राला सांगण्याची हिंमत केली. ते काल जे बोलले ते देशद्रोह आहे कारण ते म्हणाले आमची राज्यघटना अवैध आहे. हा आपल्या देशाचा आणि प्रत्येक भारतीयाच्या स्वातंत्र्याचा अपमान आहे. हे विधान इतर कोणत्याही देशात केले असते तर भागवतांना अटक करून न्यायालयीन कारवाई झाली असती. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले नाही असे म्हणणे हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. आणि आपण हे ऐकणे बंद केले पाहिजे," असं राहुल गांधी म्हणाले.
काय म्हणाले मोहन भागवत?
इंदौर येथील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना 'राष्ट्रीय देवी अहिल्या पुरस्कार' प्रदान केल्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत बोलत होते. "राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हे भारताचे खरे स्वातंत्र्य आहे. हा दिवस पौष शुक्ल द्वादशी म्हणून साजरा केला पाहिजे, जो शतकानुशतके बाह्य आक्रमणाने सहन करणाऱ्या भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याची स्थापना याच दिवशी झाली. देश स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि जगाला रस्ता दाखवता यावा यासाठी भारताने स्वतःला जागृत करण्यासाठी राम मंदिर आंदोलन सुरू केले होते. कोणाचा विरोध करण्यासाठी राम मंदिर आंदोलनाची सुरुवात केलेली नाही," असं मोहन भागवत म्हणाले.