राहुल गांधी यांनी अमेठीमधून दाखल केला उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 06:46 AM2019-04-11T06:46:10+5:302019-04-11T06:49:25+5:30
सारे गांधी कुटुंबीय उपस्थित; रोड शोला जनतेने दिला प्रतिसाद
अमेठी : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला परंपरागत मतदारसंघ अमेठीमधून बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियांका गांधी व त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा, त्यांची दोन मुले रैहान व मिराया असा सारा गांधी परिवार उपस्थित होता.
त्या आधी राहुल गांधी यांनी केलेल्या तीन किलोमीटरच्या रोड शोला लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. त्यावेळीही गांधी परिवारातील सर्व सदस्य सहभागी झाले होते. सोनिया गांधी उद्या, गुरुवारी निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी राहुल, प्रियांका गांधी, त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हेही हजर असतील.
राहुल गांधी अमेठीसोबतच वायनाडमधूनही निवडणूक लढवत आहेत. अमेठीमध्ये त्यांची लढत भाजपच्या स्मृती इराणींशी आहे. येथून राहुल तीनदा लोकसभेवर निवडून गेले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी केलेल्या रोड शोमध्ये फुलांनी सजविलेल्या एका ट्रकमध्ये राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, प्रियांका यांची दोन मुले व काँग्रेस कार्यकर्ते उभे होते. यावेळी रस्त्यांच्या दुतर्फा उभे असलेले लोक व रोड शोमध्ये सहभागी झालेले काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी यांना पुष्पहार अर्पण करत होते.
बुधवार सकाळपासून अमेठीमध्ये अतिशय जल्लोषाचे वातावरण होते. राहुल गांधी व गांधी परिवाराच्या सदस्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.
राहुल गांधी यांच्या नावाचा काँग्रेसचे कार्यकर्ते जयजयकार करत होते. ढोल वाजवून, नृत्य करून काही कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. काँग्रेस अध्यक्षांचे स्वागत करणारे फलक, भित्तीपत्रके संपूर्ण शहरभर लावण्यात आली होती. ‘विकास की आँधी, प्रियांका गांधी’, ‘अमेठी का साँसद, देश का पीएम अशा’ घोषणा या फलकांवर लिहिलेल्या होत्या. अमेठीच्या आसपासच्या गावांमधील शेकडो लोकही राहुल गांधी यांचा रोड शो पाहायला आले होते.
रोड शोमध्ये यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी सहभागी झाल्या नव्हत्या. मात्र, राहुल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी सोनिया गांधी उपस्थित होत्या. (वृत्तसंस्था)
माझ्या वडिलांची कर्मभूमी
माझे वडील राजीव गांधी यांची अमेठी ही कर्मभूमी होती. गांधी परिवारासाठी अमेठी हे पवित्र ठिकाण आहे, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. काही नाती हृदयाशी जोडलेली असतात, असेही त्यांनी सांगितले.
स्मृती इराणी आज अर्ज भरणार
राहुल गांधी यांच्या अमेठी व सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदारसंघांत समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष व राष्ट्रीय लोक दल यांच्या आघाडीने उमेदवार उभा केलेला नाही. भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उद्या, गुरुवारी अर्ज भरणार असून, त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही असतील. सोनिया गांधी याही उद्याच रायबरेलीतून अर्ज दाखल करणार आहेत.