नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केरळच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी केरळमधील एर्नाकुलम येथे पोहोचले असून याठिकाणी असलेल्या पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे नेते ओमान चांडी आणि शशी थरुर उपस्थित होते. राहुल गांधी आज आणि उद्या दोन दिवस केरळच्या दौऱ्यावर आहेत.
(केरळच्या मदतीसाठी 'गुगल'ची धाव; सात कोटींची मदत जाहीर)
केरळच्या दौऱ्यापूर्वी राहुल गांधी यांनी ट्विट केले होते. यामध्ये ते म्हणाले, मी उद्या आणि परवा केरळमध्ये राहणार आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. केरळमधील विविध मदत शिबिरांमध्ये जाणार असून मच्छिमार आणि गरजू लोकांची मदत करणाऱ्या स्वयंसेवकांची, तसेच इतर लोकांशी चर्चा करणार आहे. दरम्यान, याआधी राहुल गांधी यांनी पार्टीच्या सर्व खासदार आणि आमदारांना एक महिन्याचा पगार केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावा, असा आदेश दिला होता.
केरळ सोडून परदेशात गेले, भाजपाचा आरोपराहुल गांधी कालच ब्रिटन आणि जर्मनीच्या दौऱ्यावरुन भारतात परतले आहेत. दरम्यान, केरळमध्ये पूरग्रस्त स्थिती असताना राहुल गांधी परदेशात फिरायला गेले, असा आरोप भाजपाने केला आहे. भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, संसदेच्या सत्रानंतर राहुल गांधी यांची फिरायला जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी परदेशात जाऊन भारताची प्रतिमा खराब केली आहे, असे ते म्हणाले.