बेळगावमध्ये होत असलेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुढचा अजेंडा मांडला. पक्षाने तुम्हाला उभं केलं, आता तुम्ही पक्षाला मजबूत करायला पाहिजे, असे म्हणत राहुल गांधींनीकाँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनाही जमिनीवर काम करण्याचा स्पष्ट संदेश दिला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यसमितीच्या अधिवेशनात बोलताना राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून आपण देशाला जागे केले. याचा अर्थ असा नाही की, आपल्याकडे केडर नसले पाहिजे. लोकांचा पाठिंबा असलेला आपला पक्ष आहे. आपल्याला कार्यकर्त्यांचं जाळं तयार करावं लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.
पक्षाला बळकट करावं लागेल - राहुल गांधी
वरिष्ठ नेत्यांना उद्देशून बोलताना राहुल गांधी म्हणाले, 'वरिष्ठ नेत्यांनी पक्ष मजबूत करण्याचे काम केले पाहिजे. काँग्रेसने आपल्या सगळ्यांना मजबूत केले. अजय माकन (पक्षाचे कोषाध्यक्ष) यांना मजबूत करावे लागेल, म्हणजे राजकीय निधी मिळवून द्यावा लागेल.'
राहुल गांधींनी निधी संकलनाचा मुद्दा काढताच बैठकीत टाळ्यांचा आवाज बंद झाला. सगळीकडे शांतता पसरली. त्यावर मिश्कील भाष्य करत राहुल गांधी म्हणाले, या मुद्द्यावर टाळ्या वाजत नाहीत.
"जमिनीवर जाऊन काम करावं लागेल"
'दिल्लीत बसता ते ठीक आहे, पण मोठ्या शहरातून बाहेर पडून जिल्ह्यांपर्यंत जावं लागेल. विचारधारेसाठी लढणाऱ्यांना पक्षात जागा द्यावी लागेल. आरएसएसकडे अजिबात वाहून घेतलेले कार्यकर्ते नाहीत. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा १० टक्के जास्त वाहून घेतलेले कार्यकर्ते आहेत. पण, आपण त्यांना स्थान देत नाहीये', असे राहुल गांधी म्हणाले.
'देशात विचारधारेची लढाई सुरू आहे. एकीकडे गांधी, नानक, बसवण्णा तर दुसरीकडे मनु. ही लढाई आपल्याला लढावी लागेल', असेही राहुल गांधी म्हणाले.
अमित शाहांसारखे लोक लोकशाहीत नसावेत -खरगे
या अधिवेशनात बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे म्हणाले, "अमित शाह यांच्यासारखे लोक लोकशाही नसावेत. जसे विधान त्यांनी संसदेत बाबासाहेब आंबेडकरांबद्दल दिले, त्याबद्दल जास्त बोललं जाऊ शकत नाही', असे ते म्हणाले.