आदेश रावल
नवी दिल्ली : पक्षाच्या उदयपूर येथील चिंतन शिबिरात ‘एक व्यक्ती, एक पद’ हा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. आमची ती वचनबद्धता होती. मला आशा आहे की, पक्ष त्यावर ठाम राहील, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबतच्या बैठकीपूर्वी राहुल यांनी हे विधान केले हे विशेष.
एक व्यक्ती एक पद हे तत्त्व संघटनेतील पदांवर लागू होते. मी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार आहे, असे गेहलोत यांनी बुधवारी म्हटले होते. आपण पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवू, पण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही, असे त्यांना सुचवायचे होते. त्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह यांनी गेहलोत पक्षाध्यक्ष बनले तर त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागेल, असे म्हटले होते.
पायलट मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी...दिग्विजय यांच्या या विधानानंतर गेहलोत म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही, असे मी कधीही म्हणालाे नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी जो काही आदेश देतील तो मला मान्य असेल. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या या पवित्र्यानंतर आपण जर राजीनामा दिला तर सचिन पायलट मुख्यमंत्री होऊ नयेत, असा गेहलोत यांचा प्रयत्न आहे.