नवी दिल्ली : लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बुधवारी राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. यानंतर केंद्रीय मंत्री यांनीही स्मृती इराणी आपल्या भाषणात राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. आपले भाषण संपवून सभागृहातून बाहेर जाताना राहुल गांधींनी फ्लाइंग किस दिल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला. तसेच, स्मृती इराणी यांनी याला असभ्यता म्हटले आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या या प्रतिक्रियेला विरोध दर्शवत भाजपच्या २२ महिला खासदारांच्या वतीने लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे.
राहुल गांधी भाषण संपवून सभागृहातून बाहेर जाताना अशी घटना घडली, ज्यावर महिला खासदारांनी आक्षेप घेतला आहे. त्यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या अविश्वास ठरावाविरोधात भाषण करत होत्या. मात्र, राहुल गांधींच्या प्रतिक्रियेचा तो क्षण कॅमेऱ्यात टिपता आला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या क्षणाचे साक्षीदार असलेल्या लोकांच्या मते, जेव्हा राहुल गांधी अविश्वास प्रस्तावाच्या भाषणानंतर सभागृहातून बाहेर पडत होते, तेव्हा त्यांच्या काही फाईल्स पडल्या. त्यांना घेण्यासाठी ते खाली वाकताच भाजपचे काही खासदार त्यांच्यावर हसायला लागले. यावर राहुल गांधी यांनी भाजप खासदारांना फ्लाइंग किस दिला आणि हसत हसत बाहेर पडले.
दरम्यान, राहुल गांधींच्या या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी निशाणा साधला. महिला विरोधी व्यक्तीच संसदेत महिला खासदारांना फ्लाइंग किस देऊ शकते. असे उदाहरण यापूर्वी कधीही पाहायला मिळाले नाही. यावरून ते स्त्रियांबद्दल काय विचार करतात हे दिसून येते. हे अशोभनीय आहे, असे स्मृती इराणी यांनी म्हटले. दरम्यान, अविश्वास प्रस्तावावरील भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, स्मृती इराणी यांनीही राहुल गांधींवर जोरदार प्रहार केला.