नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) विविध मुद्द्यांवरून सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीकास्त्र सोडत असतात. हल्लाबोल करत असतात. मात्र आता राहुल गांधी एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. राहुल यांनी एका नऊ वर्षांच्या मुलाचं पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. राहुल यांनी त्या चिमुकल्याला विमानाने सफर घडवली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राहुल एका चिमुकल्याशी त्याचे स्वप्न आणि ध्येयाबाबत गप्पा मारताना पाहायला मिळतात. या व्हिडीओत राहुल यांनी त्या मुलाला एअरक्राफ्टची सैर घडवून आणल्याचं पाहायला मिळतं. "कोणतंही स्वप्न खूप मोठं असत नाही. आम्ही अद्वैतचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. आता आपलं कर्तव्य आहे की आपण एक समाज आणि एक असा पाया तयार करू जो त्याला उड्डाण करण्याची संधी देईल" असं राहुल यांनी हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे.
चिमुकल्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने टाकलं पाऊल
सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओच्या सुरुवातीला राहुल गांधी एका छोट्या मुलाशी चर्चा करताना दिसत आहेत. राहुल अद्वैतला विचारतात की तुला मोठं झाल्यावर काय बनायचं आहे? त्यावर त्याने लगेचच मला पायलट बनायचं असल्याचं म्हटलं आहे. मी पायलट यासाठी बनणार आहे कारण मला उडायचं आहे असंही अद्वैतने सांगितलं. दुसऱ्या दिवशी राहुल गांधी अद्वैतला एका विमानाच्या कॉकपिटमध्ये घेऊन जातात आणि सैर करण्याची व्यवस्था करतात.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय 'हा' जबरदस्त व्हिडीओ
राहुल गांधी आणि विमानाचे पायलट या चिमुकल्याला विमान उडवण्याचं तंत्रज्ञान शिकवतानाही या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. राहुल गांधी हे केरळच्या दौऱ्यावर असताना कन्नूरच्या इर्वती येथे अद्वैत आणि त्याच्या आई-वडिलांशी राहुल यांची भेट झाली. राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर लोकांनी याला पसंती दर्शवली आहे. इन्स्टाग्रामवर आतापर्यंत हा व्हिडीओ 1.6 लाख वेळा पाहिला गेला आहे. काहींनी राहुल गांधींचं भरभरून कौतुक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.