शीलेश शर्मानवी दिल्ली : भाजपाला गुजरातमधील जनतेने जबरदस्त झटका दिला असून, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी यांना लक्ष्य केले. संसद भवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते.राहुल गांधी म्हणाले की, तीन-चार महिन्यांपूर्वी आम्ही जेव्हा गुजरातमध्ये गेलो होतो, तेव्हा भाजपाशी लढणे काँग्रेसला शक्यच होणार नाही, असे आम्हाला सांगण्यात येत होते, पण तीन-चार महिन्यांत आम्ही ठोस काम केले. केवळ मीच नाही, तर अखिल भारतीय काँगेस समितीची टीम आणि गुजरातमधील पक्ष कार्यकर्ते व जनतेनेही ठोस काम केले. त्याचे परिणाम निकालांमधून सर्वांच्या समोर आले आहेत. भाजपाला व मोदी यांना आपल्याच राज्यात जबरदस्त झटका लागला आहे. आमच्यासाठी हे चांगले निकाल आहेत. आम्ही हरलो, हे आम्हाला मान्य आहे, पण जर आणखी थोडे प्रयत्न केले असते, तर जिंकलो असतो. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील लोकांचे मी आभार मानतो.गुजरात मॉडेलवर हल्ला करताना ते म्हणाले की, ‘मला असे लक्षात आले आहे की, मोदी यांचे जे मॉडेल आहे, ते खरे आहे, असे गुजरातचे लोक मानतच नाहीत. भाजपा व मोदी यांचे मार्केटिंग चांगले आहे, पण ते आतून पोकळ आहे. आम्ही प्रचाराच्या काळात मोदी यांना जे प्रश्न विचारले, त्यांची उत्तरे त्यांनी दिली नाहीत. निवडणुकीपूर्वी मोदी यांच्याकडे सांगण्यासारखे काही राहिले नव्हते. तीन महिन्यांत गुजरात आणि तेथील जनतेने मला खूप काही शिकविले आहे.आपल्या विरोधकांत म्हणजे भाजपाकडे पैसा होता, साधनसामग्रीची कमतरता नव्हती, सर्व प्रकारची ताकद होती, पण त्याला आम्ही प्रेमाने टक्कर देण्यात यशस्वी ठरलो आहोत.’अय्यर, सिब्बल यांच्या वक्तव्याचा फटका-काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर आणि कपिल सिब्बल यांच्या वादग्रस्त विधानामुळे राहुल गांधी यांच्या प्रयत्नांवर काही प्रमाणात पाणी फेरले गेल्याचे मत काँगे्रसचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोइली यांनी व्यक्त केले.ते म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकांसाठी राहुल गांधी हे पंतप्रधान मोदी यांना पर्याय म्हणून समोर आले आहेत. मोदी यांनी गुजरातच्या लोकांना भावनिक ब्लेकमेल केल्याचा आरोपही त्यांनी केला.
गुजरातने मोदींच्या विश्वासार्हतेला दिला मोठा धक्का, राहुल गांधींचा टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 3:08 AM